Wed, Jul 24, 2019 14:45होमपेज › Solapur › पोलिस पाटलांच्या सतर्कतेने हरवलेला मुलगा नातेवाईकांच्या ताब्यात

पोलिस पाटलांच्या सतर्कतेने हरवलेला मुलगा नातेवाईकांच्या ताब्यात

Published On: Sep 13 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 10:55PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी 

अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव परिसरात लहान मुले पळवून नेण्याचे वाढते प्रकार चालू असताना असेच केडगाव भागातील हरवलेला मुलगा करमाळ्यातील पोलिस पाटलाच्या सदस्यांच्या सतर्कतेने सापडला असून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

गणेशोत्सव बैलपोळा तसेच मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली  जिल्ह्यातील पोलिस पाटील सदस्यांची बैठक सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपवून करमाळ्याकडे विजापूर-मुंबई रेल्वेतून परत येत होते. 

यावेळी एक अल्पवयीन मुलगा बावरल्याच्या व भेदरलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी पोलिस पाटील विजय निकत, प्रताप पाटील यांच्या चाणाक्ष नजरेने ते हेरले. यावेळी त्याची प्रताप भास्कर पाटील (पाडळी), हरिश्‍चंद्र गौतम घरत (घरतवाडी), विजय भानुदास निकत (उंदरगाव) व गीता बबन पवार (हिवरवाडी) या पोलिस पाटलांनी त्याची विचारपूस केली. पण तो इतका घाबरला होता की, त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्याला धीर  देऊन विश्‍वासात घेऊन विचारपूस व चौकशी केली असता त्याने तेजस दादासाहेब खेंगट (वय 12, रा. केडगाव) असे नाव सांगितले व आपल्याला काही लोकांनी पळवून आणल्याचे सांगितले. तेजस हा केडगाव येथे इयत्ता सहावीत शिकत होता. गावातच खेळायला बाहेर गेलेला तेजस दोन दिवसांपूर्वीपासून बेपत्ता होता. याबाबत हरवल्याची तक्रारही पोलिसांत त्याच्या नातेवाईकांनी दिली होती. 

अज्ञात व्यक्तींनी अहमदनगर येथून तोंडावर रुमाल टाकून सोलापूर येथे पळवून नेऊन सोडल्याचा संशयही व्यक्त होत होता. हा मुलगा  विजापूर-मुंबई रेल्वेमध्ये बसला असता केडगाव, ता.जि. अहमदनगर येथील असल्याचे विचारपूस करता कळाल्याने त्याच्याकडून त्याच्या मामाचा मोबाईल नंबर दोन-तीन प्रयत्नात वदवून घेतला व  ताबडतोब पाडळीचे  पोलिस पाटील प्रताप पाटील यांनी त्याच्या नातेवाईकांना संपर्क करुन तेजस रेल्वेत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकाचे व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो मागवून घेतले व तेजसला दाखवून ते कोण आहेत, त्यांचे नाते काय,  याची  खात्री करून तेजस हा सुरक्षित व सुखरूप असल्याचे  त्याला न्यायला करमाळा येथील पोलिस ठाण्यात तात्काळ येण्याचे सांगितले. 

2 दिवसांपासून तेजस गायब असल्याने तेजसचे नातेवाईकसुद्धा गाडी घेऊन तेजसला शोधत होते. तेजस हरवला, की पळवून नेले, की पळाला याचा तपास नातेवाईकांवर सोडून तेजसची व्यक्तीगत शहानिशा झाल्याने सदरची माहिती करमाळा पोलिस स्टेशनचे गोपनीय विभागाचे सुनील गवारी, राजेंद्र कांबळे  यांनाही दिली. प्रताप पाटील यांनी तेजससह पोटेगावचे पोलिस पाटील अंकुश शिरगिरे यांना सोबत घेऊन पोलिस स्टेशन गाठले. तेथे आलेल्या तेजसच्या नातेवाईकांना  तेजसची ओळख पाहून त्यांच्या ताब्यात दिले.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश देवरे, हवालदार सुनील गवारी, ठाणे अंमलदार सोमनाथ कोळी यांनी पोलिस पाटलांनी केलेल्या सतर्कतेचे विशेष अभिनंदन केले. यावेळी तेजसचे नातेवाईक उपस्थित होते.