Wed, Jun 26, 2019 17:59होमपेज › Solapur › लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

Published On: Jun 14 2018 1:36AM | Last Updated: Jun 13 2018 10:23PMसोलापूर : प्रतिनिधी

खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सात-बारावर नाव लावून सात-बारा तयार करून देण्यासाठी 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या मरवडे गावाच्या मंडल अधिकार्‍यावर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरवडे गावचे मंडल अधिकारी रेवणसिद्ध पिराप्पा घोडके (वय 58, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. 

यातील तक्रारदार यांच्या सासर्‍यांनी तळसंगी गावात गट नं. 223 मध्ये 1 हेक्टर शेतजमीन विकत घेतलेली आहे. त्या विकत घेतलेल्या शेतजमिनीवर त्यांच्या सासर्‍याचे नाव लावून सात-बारा उतारा देण्यासाठी मंगळवेढ्याचे मंडल अधिकारी घोडके यांनी 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.  त्यामुळे याबाबत तक्रारदार यांनी 13 एप्रिल 2018 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 

तक्रारदारांच्या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने 16 एप्रिल 2018 रोजी करण्यात आली. त्यात तक्रारदार यांनी मंडल अधिकारी घोडके यांची दक्षिण तहसील कार्यालयासमोर असलेल्या चहाच्या गाडीवर समक्ष भेट घेऊन कामाचा विषय काढला असता घोडके यांनी तक्रारदाराकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन  मंडल अधिकारी घोडके यांच्याविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक वैभव मारकड तपास करीत आहेत.