Fri, May 24, 2019 06:49होमपेज › Solapur › अध्यक्ष महोदय, न्याय कुणाकडे मागायचा?

अध्यक्ष महोदय, न्याय कुणाकडे मागायचा?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिरफाड करीत आ. भारत भालके यांनी अध्यक्ष महोदय, न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल  विधानसभेत केला. सोमवारी  सायंकाळी विधानसभेत झालेल्या चर्चेप्रसंगी आ. भारत भालके यांनी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात पोलिस प्रशासनाचीही चांगलीच चिरफाड केली. 12 मिनिटांच्या भाषणात आ. भालके यांनी दोन्ही तालुक्यातील गुन्हेगारी, खून, दरोडे, वाळू तस्करी, पोलिसांची लाचखोरी याकडे लक्ष वेधून घेतले. 

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सोमवारी सायंकाळच्या वेळेस विधानसभेत चर्चा झाली. यावेळी  पंढरपूर-मंगळवेढ्याचे काँग्रेस  आमदार भारत भालके यांनी सुमारे 12 मिनिटांच्या भाषणात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पोलिस प्रशासनास चांगलेच फैलावर घेतले. अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची भरदिवसा हॉटेलात गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर दोन दिवस संपूर्ण शहरात  प्रचंड दहशतीचे वातावरण होते. त्यामुळे भाविकांना पिण्यास पाणीही मिळाले  नाही, या मुद्याकडे लक्ष वेधून यावेळी आ. भालके म्हणाले की, गेल्या 11 महिन्यात तीन खून झालेले आहेत. यामध्ये नामदेव भुईटे हे माजी नगरसेवक आहेत. तर संदीप पवार हे विद्यमान नगरसेवक होते. त्याचबरोबर पुंडलिक देवस्थानच्या विश्‍वस्ताचाही खून नुकताच झालेला आहे. पंढरपूर शहरात गुंड आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे भालके यांनी यावेळी सांगितले. 

संदीप पवार यांच्या खुनाच्या अगोदर काही दिवस येथील एका हॉटेल चालकास रिव्हॉल्वरचा धाक दाखवून खंडणी मागितल्याचा उल्लेख करून आ. भालके यांनी पंढरपूर शहरातील पोलिसांच्या निष्क्रीयतेवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यात गेल्या काही वर्षात घडलेल्या गुन्हेगारी घटनांकडेही आ. भालके यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. अडीच वर्षांपूर्वी अमीर अहमद मुलाणी नावाचा 14 वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याचा खून झाला. मात्र अजूनही त्या खुन्याचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही. त्या मुलाच्या आई-वडिलांनी उपोषण केले, तरीही न्याय मिळाला नाही, मग न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल करून नुकतेच दरोडेखोरांच्या हल्ल्यात वयोवृद्ध पती-पत्नीचा झालेला मृत्यूकडे लक्ष वेधून भालके म्हणाले की, मयताचे शवविच्छेदनसुद्धा येथे वेळेवर केले जात नाही.

तालुक्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळू तस्करांकडून तोतया पोलिस अनेक महिने हप्ते गोळा करत होते. वाळूचा  एक ट्रक पोलिसांनीच नेऊन शेतात लपवून ठेवला होता आणि पैसे घेऊन सोडून दिला. यामुळे पोलिसांचा, कायद्याचा धाक कमी झाल्यामुळे पोलिसही सुरक्षित नाहीत. मोहोळ येथे पोलिसांवरच हल्ला होऊन 2 कर्मचार्‍यांना जखमी व्हावे लागले. वाळू तस्करांच्या हल्ल्यात खुद्द पोलिसही जखमी झालेले आहेत. दत्ता भोसले नावाच्या पोलिस हवालदाराने निवडणुकीत परवानाधारकाने जमा केलेले रिव्हॉल्वर पोलिस ठाण्यातून चोरून नेले आणि नगरजिल्ह्यात खून केला, अशी परिस्थिती असेल तर न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल सभागृहात उपस्थित केला.  

मंगळवेढा तालुक्यात दोन आणि पंढरपूर तालुक्यात 2 पोलिस ठाणी मंजूर करावीत, अशी मागणी प्रलंबित आहे ती मंजूर करावीत. देवाच्या नगरीला तरी खमक्या अधिकार्‍याची नियुक्ती करा. त्यांना काम करण्यासाठी पूर्ण मोकळीक द्या, असेही आवाहन आ. भालके यांनी सभागृहात केले. 

Tags : Solapur,, Solapur News,  MLA Bhalke, attention, crime, murder, robbery, sand smuggling,  police bribery,  Pandharpur taluka, Mangalwedha taluka


  •