होमपेज › Solapur › वैरागमध्ये वाळूगँगची पोलिस कर्मचार्‍याला मारहाण

वैरागमध्ये वाळूगँगची पोलिस कर्मचार्‍याला मारहाण

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 08 2018 11:03PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

वाळूने भरलेला टिप्पर पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण करून  एकाच्या अंगावर टिप्पर घालून एका पोलिस कर्मचार्‍याचा टिप्परमधून अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना वैराग भागातील मिर्झनपूर-कासारी मार्गावर घडली.

सिद्धेश्‍वर भारत गायकवाड रा. मिर्झनपूर, ता. बार्शी व अन्य अनोळखी दोघे अशा तिघांवर अपहरण, सरकारी कामात अडथळा, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी कलमान्वये वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस नाईक योगेश अर्जुन मंडलिक यांनी याबाबत वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंडलिक जवळगाव बीटमध्ये कामकाज पाहतात. कासारी, ता. बार्शी येथे घरगुती भांडणे मिटवण्यासाठी ते व पो.कॉ. सदाशिव केंद्रे हे दोघे खासगी मोटारसायकलवर सरकारी गणवेशात कासारी गावाकरिता जात असताना कासारी गावाच्याजवळ आल्यावर एम.एच. 13 ए. एक्स. 3735 हा वाळू भरलेला टिप्पर समोरील बाजूस नंबर नसलेला व क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेला ट्रक कासारी गावातून वेडीवाकडी वळणे घेत भरधाव वेगात जाताना त्यांना दिसला.

त्यामुळे त्यांनी इशारा करून टिप्पर चालकास टिप्पर थांबविण्यास सांगितले. परंतु तो न थांबता तसाच पुढे जाताना त्यास थांबवून चालक परवाना व वाहत असलेल्या वाळूची पावतीबाबत विचारणा केली. कोणतीही कागदपत्रे सोबत नसल्याचे चालकाने सांगितल्याने पोलिसांनी त्यास सदर टिप्पर वाळूसह वैराग पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले.तेव्हा चालकाने तुम्ही कोण मला विचारणार, तुमचा काय संबंध, अशी अरेरावीची भाषा वापरून तुम्हाला बघून घेतो, थांबा थोड्याच वेळात माझा मालक येत आहे, असे म्हणाला. त्यावेळी पोलिसांनी चालकास  तुझ्या मालकास कागदपत्रासह पोलिस ठाण्यास येण्यास सांग, असे सांगून त्या टिप्परमध्ये पो.कॉ. केंद्रे यांना बसवून टिप्पर वैरागकडे घेण्यास सांगितले.

त्यानंतर चालकाने हो म्हणून टिप्पर चालू करून घेवून कासारी-भांडेगाव चौकात येऊन बंद केला व चालू होत नसल्याचे सांगितले. त्यावेळी सिद्धेश्‍वर भारत गायकवाड रा. मिर्झनपूर हे अन्य  एका अनोळखी इसमासह मोटरसायकलवरून तेथे आले व त्यांनी फिर्यादीस दमदाटी करत अंगाला झटापट करून सरकारी कामात अडथळा आणला. तसेच हा टिप्पर घाडगे साहेबांचा आहे, तू आमच्यावर केसच कर असे म्हणत मंडलिक यांच्या उजव्या  हाताला धरत त्यांना टिप्परकडे ओढत नेले व तो अनोळखी इसम टिप्पर चालकास म्हणाला की, तु टिप्पर चालू कर आम्ही याला धरतो, तु टिप्पर डायरेक्ट याच्या अंगावर घाल, असे म्हणाल्यावर टिप्पर चालकाने टिप्पर चालू करून पोलिसांच्या दिशेने टिप्पर घेऊन आला. त्यावेळी त्यांनी झटापट करून सुटण्याचा प्रयत्न केला, त्या अनोळखी इसमाने मंडलिक यांना मारून खाली पाडले. त्यावेळी टिप्परमधील पोलिस कर्मचारी केंद्रे  यांनी स्टेरिंग ओढल्याने टिप्पर बाजूने पुढे गेला.

टिप्पर चालक पोलिस कर्मचारी केंद्रे यांना टिप्परमध्ये घेवून कासारी गावाच्या दिशेने वेगात निघून गेला. मंडलिक हे टिप्परच्या मागे गेले असता पो.कॉ.केंद्रे यांना कासारी ते मसले चौधरी रस्त्यावर कासारी गावापासून पुढे दोन किमी अंतरावर अंधारात सोडण्यात आले. केंद्रे यांनी चावी घेण्याचा प्रयत्न केला असता चावी अंधारात फेकून देण्यात आली. तसेच केंद्रे यांनाही फेकून देण्याची धमकी दिली. योगेश मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुहास जगताप हे करत आहेत.