Thu, Feb 21, 2019 09:43होमपेज › Solapur › ‘उजनी’त तीन धरणांतून पाण्याची आवक सुरू

‘उजनी’त तीन धरणांतून पाण्याची आवक सुरू

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 9:59PMबेंबळे : वार्ताहर

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वरचेवर वाढत चालला असून उजनीवरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या धरणांपैकी  कलमोडी धरण 100 टक्के भरले आहे. या धरणासह तीन धरणांतून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

या पावसाळ्यात पहिल्यांदाच वरील तीन धरणांतून विसर्ग सुरू झाला असून यापुढे उजनीतील पाणीपातळीत वाढ होत राहणार आहे. 19 धरणांपैकी वडिवळे, कलमोडी, खडकवासला या धरणांतून पाणी सोडले जात आहे. वडिवळे 1409 क्युसेक, कलमोडी 471 क्युसेकने उजनीत विसर्ग सुरू झाला आहे.
कालपासून 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे.

वडिवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 272 मि.मी. पावसाची नोंद काल झाली आहे, तर इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे लवकरच बाकी धरणांतून मोठ्या प्रमाणात उजनीत विसर्ग येण्यास सुरुवात होणार आहे.

सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली नसली तरी त्यावरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे.