Mon, May 20, 2019 10:55होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यात डाळिंब बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव

पंढरपूर तालुक्यात डाळिंब बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:12PMपंढरपूर : प्रतिनिधी 

 शेतकर्‍यांनी हजारो रुपये औषध पाण्यावर खर्च करून पिकवलेल्या डाळिंब बागांवर सद्याच्या खराब वातावरणामुळे तेल्या व मररोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. औषध फवारण्या करूनदेखील रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना शासनाने नुकसान भरपाई म्हणून अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

मागील वर्षी डाळिंबाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर कमालीचे घसरले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी अडचणीत सापडले. तर चालू वर्षी सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र त्यानंतर दोन महिने उघडीप घेतल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. यात डाळिंब बागांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे. परंतु ऑगस्टच्या सुरुवातीलाच निरा उजवाचे व सद्या उजनीचे पाणी फळबागांना मिळाल्याने कालवा परिसरातील फळबागांना दिलासा मिळाला असला तरी सद्या रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामूळे डाळिंब बागेवर तेल्या, मर, व कुजवा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहेत.

हजारो रुपये खते व औषधांवर खर्च करुन फुलवलेल्या बागा रोगामुळे फळे नष्ट होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. झाडावरील  तेल्याग्रस्त व कुजवा लागलेली फळे तोडून शेताबाहेर टाकण्याचे काम शेतकरी करत आहे. परंतु रिमझिम पाऊस आला व फळबागेवर पाणी साचून राहिले की तेल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोगावरी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही घेतले जात आहे. तरीही लिंबू, पेरुच्या आकारातील फळे नष्ट होत आहेत. एकदा का बागेत तेल्या शिरला की झाडाला वेढला जात आहे. त्यामुळे फळांबरोबर झाडेही नष्ट होऊ लागली आहेत.सद्या डाळिंबचे दर पडले आहेत. त्यामुळे दोन महिन्यानंतर दरवाढ होईल. या आशेने शेतकर्‍यांनी डाळिंब बागा फुलवल्या आहेत. मात्र त्यावर रोगाने हल्ला चढवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. चालू हंगामात दरवाढ झाली नाही. 30 ते 50 रुपये दरम्यान प्रतिकिलो दर मिळत आहे. तर खराब डाळिंबाची विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला आहे. यातच रोगाने बागा नष्ट होऊ लागल्याने शासनाने शेतकर्‍यांना अनुदान देऊन हातभार लावावा अशी मागणी शेतकर्‍यातून होत आहे.