होमपेज › Solapur › कंत्राटी कर्मचार्‍यांच्याबाबतीत जाचक शासन निर्णय अखेर मागे 

कंत्राटी कर्मचार्‍यांच्याबाबतीत जाचक शासन निर्णय अखेर मागे 

Published On: Mar 09 2018 10:36PM | Last Updated: Mar 09 2018 10:26PMसोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात  आलेल्या धरणे आंदोलनास यश आले असून शासनाने 9 फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन परिपत्रकास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्थगिती दिली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची मध्यस्थी यशस्वी ठरली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे कोअर कमिटीचे सदस्य व जिल्हा कंत्राटी कर्मचारी महासंघाचे समन्वयक सचिन जाधव यांनी दिली. राज्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी सर्व मतभेद विसरून सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलने केली होती. सोलापूर जिल्ह्यातील या आंदोलनास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आमदार प्रशांत परिचारक यांनी भेट दिली होती. 

यावेळी ना. देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनास भेट देऊन परिपत्रक रद्द करण्याची ग्वाही दिली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे स्वत: कामगार मंत्री असल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन राज्यातील सर्व 3 लाखांपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी यांची परिस्थिती मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. 
मुख्यमंत्री फडवणीस यांनी तात्काळ सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत स्थगिती देऊन पुनरावलोकन करणेबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कारवाई करत स्थगिती आदेश शासनाने काढला आहे. 

मुख्यमंत्री यांचे आभार : सचिन जाधव 

कंत्राटी कर्मचारी यांच्या प्रश्‍नांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतल्याबद्दल त्यांचे राज्य शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने आभार व्यक्‍त करण्यात आले आहे. या परिपत्रकास स्थगिती न देता पुनरावलोकन करताना रद्द करावे. राज्यातील सर्व रिक्त पदावर अनुभवी कंत्राटी कर्मचारी यांना कायम करावे. या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत, असेही जाधव यांनी सांगितले. 

जिल्हा शासकीय कंत्राट कर्मचारी महासंघाचे जिल्हा समन्वयक सचिन जाधव, डॉ. सयाजीराव गायकवाड, अविनाश घाडगे, राजीव देवकते, शहाजहान शेख, एन.वाय. दलाल, भगवान भुसारी, कुंडलिक आलदर, राजाराम बाबर, राजाराम वाघमारे, शंकर बंडगर, सचिन सोनवणे, दिनेश राठोड, महादेव शिंदे, प्रशांत दबडे, प्रशांत फडतरे,यशवंती धत्तुरे, दीपाली व्हटे, अर्चना कनकी, सचिन चवरे, संतोष खलिपे, प्रशांत शिंदे, उमेश येळवणे, सतीश शिंगे, मोनिका दिनकर, आम्रपाली गजघाटे, धर्मराज संखनवरु, एकनाथ जगताप, अनिकेत जगताप आदींनी यासाठी पुढाकार घेतला होता.