Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Solapur › अवैध मच्छीमारी करणार्‍याकडून शासकीय अधिकार्‍यास मारहाण

अवैध मच्छीमारी करणार्‍याकडून शासकीय अधिकार्‍यास मारहाण

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:42PM

बुकमार्क करा
 

करमाळा : तालुका प्रतिनिधी

अवैध मच्छीमारी करणार्‍या ठिकाणावर छापा मारण्यास गेलेल्या जलसंपदा विभागाच्या दोघा कर्मचार्‍यांपैकी एकास तिघांनी कोयता, गज, दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये एक शाखाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. दादा अनंता काळे (वय 57, रा. मूळ वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या भीमा उपसासिंचन शाखा क्र. 1, आदिनाथ कारखाना, जेऊर) असे गंभीर जखमी झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चिखलठाण येथील उजनी जलाशयाजवळ घडला. उमेश राजाराम गलांडे, राजाराम बलभीम गलांडे, लक्ष्मी राजाराम गलांडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. शाखा अधिकारी दादा अनंता काळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

दादा काळे हे भीमा उपसासिंचन विभागात उजनीचे सिंचन व्यवस्थापन व जलाशयातील जलचर प्राण्यांच्या रक्षण विभागात काम करतात. यापूर्वीही 15 डिसेंबर 2017 ला  चिखलठाण येथे अवैध मासेमारी केली जात होती. त्यामुळे काळे हे सहकारी आणि पोलिस घेऊन घटना स्थळी गेले, पण त्याठिकाणी कोणीही आढळले नाही, तर त्याच ठिकाणी मासे पकडण्याचे जाळे सापडले. चौकशीत ते जाळे उमेश गलांडे यांचे असल्याचे समजले. बोलावून याबाबत विचारले असता असे पुन्हा करणार नसल्याचे गलांडे यांनी सांगितले. सर्व अधिकार्‍यांनी ताकीद देऊन माघारी फिरले होते. तरीही यावेळी गलांडे याने पुन्हा इकडे येऊ नका, असा दम भरला. याकडे कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केले होते, पण पुन्हा 5 जानेवारी रोजी कार्यालयात असताना काळे यांना काही लोक अवैध मासेमारी करत असल्याची माहिती मिळाली. यावेळी सहकारी कालवा निरीक्षक अरुण नारायण गुटाळ यांना सोबत ते घेऊन चिखलठाण येथे गेले. हरी नेमाणे यांच्या खासगी बोटीतून सुराणा यांच्या शेतातील विहिरीजवळ गेले असता उमेश गलांडे यांच्यासह राजाराम व लक्ष्मी हातात दगड घेऊन बसले होते.

त्यावेळी दमदाटी व शिवीगाळ करीत काळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या तिघांनी शेतात लपवलेले गज, कोयता हातात घेऊन मारण्यास सुरुवात केली. एकाने डोळ्याजवळ, पाठीवर, हातावर गजाने, तर दुसर्‍याने कोयत्याने पायाच्या नडघीवर मारून जखमी केले. यावेळी अरुण गुटाळ हे सोडवासोडवी करत होते. मात्र, खाली पाडून जबर मारहाण करण्यात आल्याने ते चालू शकत नव्हते. यावेळी पोलिसांना बोलविण्यात आले. दरम्यान, आरडाओरडा ऐकून काही लोक आल्याचे पाहून तिघेही पळून गेले. जेऊर पोलिसांनी घटनास्थळी दहा हजार रुपयांचे 80 ते 90 किलो वजनाची माशाची पिल्ले हस्तगत केली व पाण्यात सोडून दिली. दादा काळे हे गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी इंदापूर येथे नेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, विश्‍वासराव पवार हे करीत 
आहेत.