Sat, Jul 20, 2019 10:46होमपेज › Solapur › खुल्या जागेतील अतिक्रमणे ठेवून भाजीपाला विक्रेत्यांनाच हटविले

खुल्या जागेतील अतिक्रमणे ठेवून भाजीपाला विक्रेत्यांनाच हटविले

Published On: Mar 09 2018 10:36PM | Last Updated: Mar 09 2018 8:50PMपंढरपूर : प्रतिनिधी

शहरातील खुल्या जागेत असलेली बेकायदा अतिक्रमणे हटवण्याऐवजी जागेची मागणी करणार्‍या भाजीपाला विक्रेते आणि शेतकर्‍यांनाच हटवण्याची मोहीम पंढरपूर नगरपालिकेने हाती घेतली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापारी आणि शेतकर्‍यांनी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. मात्र त्यानंतरही नगरपालिका प्रशासन रोगावर इलाज करण्यापेक्षा पुन्हा तात्पुरती मलमपट्टी करीत असल्याचे दिसून येत आहे. 

पंढरपूर शहरात अधिकृतरित्या 3 ठिकाणी भाजी मंडई आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी भाजी मार्केट ग्राहकांनीच पाठ फिरवल्यामुळे ओस पडले आहे.  शेळके वस्ती भाजी मंडईतही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे  भाजीपाला विक्रेत्यांनी तेथून आपला व्यवसाय हलवला आहे. 

नव्या पेठेत असलेल्या खुल्या जागेत गेल्या अनेक दशकांपासून भाजी मंडई चालत आहे. गेल्या काही वर्षांपासून विक्रेत्यांची संख्या वाढू लागली आहे. राज्य सरकारने भाजीपाला आणि शेतमाल बाजार समितीतून मुक्‍त केल्यामुळे थेट शेतकरीही भाजीपाला घेऊन भाजी मंडईत येऊन बसू लागले आहेत. परिणामी नव्या पेठेतील जागा भाजीपाला विक्रेत्यांना कमी पडू लागली आहे आणि हे भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसू लागले आहेत. भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आल्यामुळे रहदारीला अडथळा वाढू लागला आहे. जागोजागी वाहतुकीची कोंडी वाढीस लागली आहे. 

नवी पेठ व्यापारीसंकुल, नव्या पेठेतील कुस्तीचे मैदान, झेंडा चौक येथे शेकडो खोकी अतिक्रमण करून टाकण्यात आलेली आहेत. त्यापैकी नवी पेठ व्यापारीसंकुलाच्या आतील बाजूस व्यापारी कमिटीच्या कार्यालयाच्या जवळपास असलेल्या खोक्यांतून मोठ्या प्रमाणात जुगार, मटक्यासारखे अनधिकृत व्यवसाय उघडपणे चालत आहेत. कुस्ती मैदानाच्या जागेत खोकी टाकून ते खोकीधारक भाजीपाला विक्रेत्यांना ही खोकी भाड्याने देत आहेत. या खोक्यांमुळेच भाजीपाला विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागत आहे. ही खोकी हटवून खुल्या जागेत भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. मात्र गेल्या सहा दिवसांपासून नगरपालिका प्रशासन खुल्या जागेतील अतिक्रमणे तशीच ठेवून केवळ रस्त्यावर बसणार्‍या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे. त्यामुळे दुखण्यावर कायमस्वरूपाचा इलाज करण्यापेक्षा वरवरची तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. भाजीपाला विक्रेते आणि शेतकर्‍यांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.