Tue, Mar 19, 2019 12:24होमपेज › Solapur › अन्‍न भेसळ विभागाचे माघी वारीकडे दुर्लक्ष

अन्‍न भेसळ विभागाचे माघी वारीकडे दुर्लक्ष

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 11:30PMपंढरपूर : प्रतिनिधी

माघी यात्रा सोहळा सुरू झाला असून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने तपासणीची मोहिम हाती घेण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त केलेली टीम अद्याप  पंढरीत दाखल झाली नसल्याने हॉटेल्स, हातगाडे, टपर्‍यातून भेसळयुक्त व अस्वच्छ अन्नपदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने  भाविकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

माघी वारीसाठी आलेल्या लहान मोठ्या दिंड्या, पालख्या व भाविकांमुळे पंढरीनगरी गजबजू लागली आहे. 65 एकर येथे भाविक मोठ्या संख्येने तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करीत आहेत. तर शहर व परिसरातही भाविक वास्तव्य करीत आहेत. या ठिकाणी छोटी मोठी हॉटेल्स, हातगाडे, चहाच्या टपर्‍या, दुग्धजन्य पदार्थ विक्री तसेच प्रासादिक साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर नाश्ता, चहा व भोजन करण्यासाठी भाविक येत आहेत. मात्र अन्नपदार्थांची स्वच्छता न बाळगता उघड्यावर विक्री सुरू असल्याने धूळ, माशा अन्नपदार्थावर बसत आहेत. त्याचबरोबर अस्वच्छ पाणी, भेसळयुक्त तेल, दुग्धजन्य पदार्थ व साहित्य वापरले जात असल्याचे चित्र दिसून येते. वारी काळात उघड्यावरील अन्नपदार्थ सेवन केल्यामुळे भाविकांचे आरोग्य बिघडत आहे.

भाविकांसाठी प्रशासनाकडून खास प्रथमोपचार केंद्रे उघडण्यात आली असली तरी अस्वच्छ व भेसळयुक्त अन्नपदार्थांमूळे भाविक मोठ्या संख्येने आजारी पडत असल्याचे चित्र प्रथमोपचार केंद्रावर औषधोपचार करण्याकरती जमलेल्या गर्दीवरून लक्षात येते. माघी यात्रा सुरू होऊन पाच दिवसाचा कालावधी लोटला तरी अधिकार्‍यांची टीम  फिरकली नसून केवळ एक अन्न निरीक्षक काम पहात  असल्याने भाविकातून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.