होमपेज › Solapur › भीमेत पाणी सोडणे बंद केल्यास पूर्व भाग बकाल

भीमेत पाणी सोडणे बंद केल्यास पूर्व भाग बकाल

Published On: Jun 28 2018 11:56PM | Last Updated: Jun 28 2018 8:43PMश्रीपूर : वार्ताहर

उजनीचे पाणी आल्यानंतर माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांनी नीरा कालव्याचे पाणी घेणे बंद केले. त्यांचा हा निर्णय मोठा घातक ठरला आहे. सध्या उजनी आठमाही झाली आहे. भविष्यात भीमेत पाणी सोडणे बंद झाल्यानंतर हा परिसर बकाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्‍त केले.खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्या निमित्ताने लवंग (ता. माळशिरस) येथे नागरी सत्कार करण्यात आला व आशियायी टेनिस स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्त्व करणारी ऋतुजा भोसले हिचा ही जाहीर सन्मान खा. मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, उजनीचे पाणी आल्यानंतर अनेक गावांतील शेतकर्‍यांनी नीरा कालव्याच्या पाण्यावरील  हक्‍क सोडला. त्यांना उजनीच्या पाण्यावर खूप भरवसा होता. परंतु कालांतराने उजनीचे पाणी बेभरवशाचे झाले. बारमाही उजनी सध्या आठमाही झाली आहे. सोलापूरला पिण्याचे पाणी नेण्यासाठी नवीन जलवाहिनी झाल्यानंतर भीमा नदीत पाणी सोडणे बंद होईल. त्यानंतर या परिसराचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्‍त केली. 

ऋतुजा भोसले यांनी आपल्या तालुक्याचे नाव देशात नव्हे तर जगात उज्ज्वल केले आहे. तिचा सर्वांना सार्थ अभिमान असायला हवा, आज तिचा तिच्या मातृभूमीत सत्कार होत आहे. जगातील कोणत्याही सत्कारापेक्षा मातृभूमीतील सत्कार अनमोल असतो असे सांगून तिच्या यशा मागे तिच्या आई वडिलांची तपश्‍चर्या असल्याचे खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.ऑगस्टमध्ये इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणार्‍या आशियायी क्रीडा स्पर्धेत  टेनिस खेळात भारताचे प्रतिनिधीत्त्व करणारी ऋतुजा भोसले हिला मातृभूमीतील सत्कार पाहून गहिवरून आले. या सन्मानाने माझा आत्मविश्‍वास दुणावल्याची भावनिक प्रतिक्रिया तिने व्यक्‍त केली. 

यावेळी ऋतुजाचे वडील पोलिस अधिकारी संपतराव भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, पोलिस निरीक्षक अरूण सावंत यांचीही भाषणे झाली. खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांची चार किलोमीटर अंतराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमास  सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जि.प.सदस्या स्वरूपराणी मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, अरूण तोडकर, लतिका कोळेकर, निता भोसले, सरपंच योगीता सरवदे, उत्तम भिलारे , विजयकुमार पाटील, सूर्यकांत भंडगे, नितीनराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.