Mon, Apr 22, 2019 16:28होमपेज › Solapur › तुळजापूर पोलिस ठाण्यास आयएसओ मानांकन प्राप्त

तुळजापूर पोलिस ठाण्यास आयएसओ मानांकन प्राप्त

Published On: Feb 28 2018 1:11AM | Last Updated: Feb 27 2018 9:37PMतुळजापूर : प्रतिनिधी

पोलिस ठाणे म्हणजे जुन्या आणि भिंतीचे रंग आणि पोपडे उडालेल्या खोल्या, जुनाट लाकडी बाकडे, रेकॉर्डच्या फाईली असे डोळ्यासमोर येणारे पारंपरिक चित्र उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाने बदलत कायापालट केला आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना कॉर्पोरेट लूक मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व 18 पोलिस ठाण्यांना आय.एस ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. यात तुळजापूर पोलिस ठाण्याचा समावेश आहे.

तुळजापूर पोलिस ठाण्यास आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झाल्याबद्दल दिलीप(अप्पा) गंगणे नागरी पतसंस्थेच्या वतीने तुळजापूर पोलिस ठाण्यास देवीची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी, तुळजापूर पोलिस ठाण्याचा परिसर पर्यावरणपूरक आणि सुशोभित करण्यात आला असून, नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आरोपीसाठीच्या कोठडीत सर्व मूलभूत सुविधा, लाईट, सीसीटीव्ही, तक्रारदारांना बसण्याची आसन व्यवस्था व सुसज्ज वाहनतळ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

पोलिस ठाण्यात पशु-पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून पोलिस ठाण्यातील वातावरण प्रसन्न राहावे, यासाठी तेथील परिसर रंगीबेरंगी कुंड्यांनी, वेगवेगळ्या कायदेविषयक माहिती फलकांनी परिसर  सजविण्यात आला आहे. पोलिस ठाण्यातील सर्व रेकॉर्ड संगणकीकृत करून अद्ययावत करण्यात आले आहे. नागरिकांसाठी गोपनीय माहिती सूचना व तक्रार पेटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

पोलिस स्टेशनचे रुप बदलत असताना येथील कारभार पारदर्शक व लोकाभिमुख असावा, यादृष्टीने येथील कार्यपद्धतीत सुयोग्य बदल करण्यात आला आहे. पोलिस व पोलिस ठाण्याविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेली भीती दूर करत पोलिस व जनता यांच्यात स्नेहाचे वातावरण असावे, यादृष्टीने येथील कामकाजाची मांडणी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केले. तुळजापूर पोलिस ठाण्याला आय.एस. ओ. मानांकन प्राप्त झाल्याबद्दल येथील दिलीप (अप्पा) गंगणे नागरी पतसंस्थेच्या वतीने तुळजापूर पोलिस ठाण्यास कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, संस्थेचे चेअरमन संदीप गंगणे, किरण हंगरगेकर, अमर वाघमारे, देवेंद्र पवार, अभिजित कदम, आप्पा पवार, मिलिंद रोकडे, सचिन काटकर, सद्दाम शेख आदींची उपस्थिती होती.