होमपेज › Solapur › आयपीएल बेटिंग : 8 जणांना पकडले

आयपीएल बेटिंग : 8 जणांना पकडले

Published On: Apr 24 2018 11:26PM | Last Updated: Apr 24 2018 11:12PMसोलापूर : प्रतिनिधी

सांगोला  येथे  इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलवर मोबाईलद्वारे सट्टा लावून जुगार खेळणार्‍यांवर सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकातील पोलिसांनी कारवाई करीत दोन वाहने, मोबाईलसह 39 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सांगोला पोलिस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. 

आयपीएलवर सांगोल्यातून मोबाईलवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधिकार्‍यांनी खबर्‍यांकडून या सट्ट्याची माहिती घेतली होती. सोमवारी रात्री आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होता. या सामन्यावेळी मोठ्या प्रमाणात मोबाईलवरून सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके करुन सोमवारी रात्री एकाचवेळी सांगोला येथील अलराईनगर, कडलास रोडवरील अनिल चव्हाण याच्या कृष्णाई बंगल्यावर तसेच एकतपूर रोडवरील ड्रीम सिटी अपार्टमेंटमधील नाथा जाधव याच्या फ्लॅटवर छापा टाकला. 

अनिल चव्हाण याच्या बंगल्यात अनिल किसन चव्हाण (वय 43, रा. अलराईनगर, सांगोला), सुनील आनंदा भोसले  (45, रा. बेहरे चिंचोली, ता. सांगोला), कृष्णा प्रभाकर सांळुखे (26, रा. कुंभार गल्ली, सांगोला), युवराज शिवाजी मेटकरी (24, रा. गोंधळेवस्ती, ता. सांगोला) हे दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब या मॅचवर सट्टा खेळताना मिळून आले.  तर नाथा जाधव याच्या फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात नाथा जाधव (रा. ड्रीम सिटी अपार्टमेंट, सांगोला), दीपक बाबर (रा. वासूद रोड, ता. सांगोला), गणेश निंबाळकर (रा. धनगरगल्ली, सांगोला), अब्बास पटेल (रा. मस्के कॉलनी, ता. सांगोला) हे सट्टा खेळताना मिळून आले.

यावेळी  पोलिसांनी सट्टा खेळण्यासाठी वापरण्यात आलेले 20 मोबाईल  हँडसेट, 2 एलईडी टीव्ही, 2 एअरटेल कंपनीचे सेटटॉप बॉक्स, कॉल ट्रान्समिशन सिस्टिमचे 12 मोबाईलचा 1 सेट व 9 मोबाईलचा 1 सेट, इनव्हटर्र्र, बॅटरी, टिपिलिंग कंपनीचा र्‍हाऊटर, हेडफोन, प्रिंटर, एक्सटेन्शन बॉक्स, मोटारसायकल, 2 इनोव्हा कार, रोख रक्‍कम असा 39 लाख 8 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत  सांगोला  पोलिस ठाण्यात 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ, संदीप धांडे, पोलिस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, बाबुराव म्हेत्रे, रियाज शेख, गणेश निंबाळकर, सहायक फौजदार अल्ताफ काझी,  महिला पोलिस शिपाई अनिसा शेख, नाझनीन मड्डी आदींकेली. 
 

Tags : IPL betting, Arrested,m Sangola, Solapur