Tue, May 21, 2019 04:46होमपेज › Solapur › हुतात्मा स्मृती मंदिराची व्यवस्था सुधारा

हुतात्मा स्मृती मंदिराची व्यवस्था सुधारा

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 8:49PMसोलापूर : प्रतिनिधी

हुतात्मा स्मृती मंदिरातील (नाट्यगृह) ना खुर्च्या व्यवस्थित आहेत ना रंगमंच व्यवस्थित आहे. ग्रीन रुम्सबद्दल तर न बोललेले बरे. त्यामुळे हुतात्मा स्मृती मंदिराची एकूणच व्यवस्था अतिशय वाईट असून ती तातडीने सुधारावी, अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे कार्यकारी सदस्य भरत जाधव यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली. 

एका नाटकाच्या प्रयोगासाठी भरत जाधव शुक्रवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी स्मृती मंदिराचा कोपरानकोपरा फिरुन पाहिला व तेथील अस्वच्छता, मोडलेल्या खुर्च्या, बंद पडलेले एसी आदी बाबींची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली.  

भरत जाधव म्हणाले की, वास्तविक हुतात्मा स्मृती मंदिराची रचना खूप चांगली आहे. प्रेक्षकांच्या आसनाची व्यवस्था इतकी उत्तम आहे की, विनोदी प्रयोगाच्या वेळी शेवटच्या रांगेतील खुर्च्यांवर बसलेल्या प्रेक्षकांपासून ते अवघ्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकांच्या हास्याचा खळखळाट थेट आम्हा रंगमंचावरील कलावंतांच्या अंगावर येतो. त्यामुळे  आम्हाला आमच्या उत्तम कामाची पावती मिळते. स्मृती मंदिरात अनेक वर्षे आम्ही प्रयोग केले. इथल्या कलाकारांच्या खोल्यांमध्ये राहिलो, मोकळ्या पोर्चमध्ये क्रिकेट खेळलो आहे. अनेक दिग्गज कलावंतांनी इथे प्रयोग केले आहेत. इतकी मोठी परंपरा या नाट्यगृहाला आहे. त्यामुळे त्याची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे. 

यावेळी ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर, स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगावकर, गटनेते  चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, नाट्य व्यवस्थापक प्रशांत बडवे, गुरु वठारे, विजय साळुंखे उपस्थित होते.

तुटकी खुर्ची उचलली 

भरत जाधवांनी प्रेक्षागृहात फिरताना तुटलेल्या खुर्च्या थेट हातात उचलून घेत आसन व्यवस्थेविषयी खंत व्यक्त केली. मायबाप प्रेक्षक तीनशे-चारशे रुपये मोजून अशा खुर्च्यांवर अडीच तास कसा बसू शकेल. अशी आसन व्यवस्था असेल तर नाटकांचा प्रेक्षकवर्ग आपोआप कमी होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

‘स्मार्ट सिटी’तून आणखी एक नाट्यगृह ः डॉ. ढाकणे

जुळे सोलापूरमध्ये ‘स्मार्ट सिटी’तून आणखी एक नाट्यगृह तयार करण्यात येणार आहे. ते होईपर्यंत महापालिकेकडून हुतात्मा स्मृती मंदिराचे निश्‍चितच नूतनीकरण केले जाईल. प्रेक्षकांना चांगल्या सुविधा पुरवण्यात येतील, असे आश्‍वासन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.