सोलापूर : प्रतिनिधी
पतीच्या छळास कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या असून सोलापुरात मात्र नेमके उलटे घडलेले आहे. पत्नी व तिच्या प्रियकराच्या छळास कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून जोडभावी पेठ पोलिसांनी पत्नी व तिच्या भावास अटक केली आहे. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अश्विनी-भडंगे निकते व चेतन निकते (रा. पुणे) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. अनुपम राजेंद्र भडंगे (वय 30, रा. पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सुनीता राजेंद्र भडंगे यांच्या फिर्यादीवरून अश्विनी निकते, तिची आई मीरा निकते, भाऊ चेतन निकते व प्रियकर राहुल रासकर (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पश्चिम मंगळवार पेठेत राहणार्या अनुपम भडंगे यांचा विवाह पुणे येथील अश्विनी निकते हिच्याशी सन 2012 मध्ये झाला होता. लग्नानंतर अश्विनी व अनुपम यांना एक मुलगा झाला. अनुपम यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय होता, तर अश्विनी ही एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये कामाला जायची. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अश्विनी ही सासरी न नांदता पुणे येथे माहेरी राहण्यास गेली होती. अश्विनी हिचे पुणे येथील राहुल रासकर याच्याशी प्रेमसंबंध होते हे अनुपमला माहिती झाल्यानंतर अश्विनी, तिची आई मीरा, भाऊ चेतन व प्रियकर राहुल हे सर्वजण अनुपम याने अश्विनीला घटस्फोट द्यावा म्हणून त्याला सतत त्रास देत होते. त्यामुळे अनुपम हा तणावाखाली होता.
रविवारी अनुपम याची आई सुनीता या मुलीकडे कोल्हापूरला गेल्या होत्या. त्यावेळी अनुपम हे घरात एकटेच होते. सुनीता यांनी रविवारी अनुपम याच्या फोनवर कॉल केला असता तो उचलला नाही. पहाटेच्या सुमारास सुनीता या घरी आल्या असता त्यांना दीर संतोष भडंगे यांनी अनुपमने गळफास घेतल्याचे सांगितले. त्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांगितले तसेच अनुपमचा मित्र गणेश कालेकर याने अनुपमने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, त्याच्या आत्महत्येस अश्विनी, मीरा, चेतन व राहुल रासकर हे जबाबदार असल्याचे लिहिले आहे. या चिठ्ठीमध्ये अश्विनी व राहुल रासकर यांच्यात अनैतिक संबंध असल्यामुळे मानसिक दडपणाखाली असून मीरा निकते व चेतन निकते या दोघांनी अनुपमपासून ही बाब लपवून ठेवली तसेच पोलिसांत तक्रार देतो का म्हणून धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून अनुपमने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अश्विनी व तिचा भाऊ चेतन या दोघांना अटक केली असून मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायदंडाधिकारी माने यांनी दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस उपनिरीक्षक सानप तपास करीत आहेत.