पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर : प्रतिनिधी
गादेगाव (ता. पंढरपूर) येथील पती-पत्नीच्या भांडणावेळी पतीने खोर्याने मारहाण केल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर या घटनेत पती जखमी झाला आहे. पल्लवी विजय बागल (वय 27) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे, तर जखमी पती विजय जालिंदर बागल (30) यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पल्लवी हिचे विजय जालिंदर बागल यांच्यासोबत सुमारे 8 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर पल्लवीसोबत सासरच्या मंडळींची सतत भांडणे होत होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पल्लवी माहेरी गेली होती. त्यानंतर नुकतीच पल्लवी परत नांदण्यासाठी सासरी आली होती. गेल्या दोन दिवसांपासून पती-पत्नीत घरगुती कारणावरून भांडण सुरू होते. शुक्रवारी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. याचवेळी पतीने खोर्याने मारहाण केल्याने झालेल्या हाणामारीत पत्नी पल्लवीचा जागीच मृत्यू झाला, तर पती विजय जखमी झाला आहे. त्याच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे वृत्त समजताच गादेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून घटनेचा पंचनामा केला आहे. पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यासंदर्भात तालुका पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.अधिक तपास पो.ह. गायकवाड करीत आहेत.