Thu, May 23, 2019 20:33
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पंढरपुरात मानवी साखळी  

पंढरपुरात मानवी साखळी  

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 9:26PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रविवारी आंदोलनास प्रचंड गर्दी उसळली आहे. दरम्यान, सकाळी पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात आली. ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रोपळे जिल्हा परिषद गटातील सर्व गावांतील हजारो युवक आणि नागरिक घोषणाबाजी करीत आले आहेत. तहसील कार्यालयासमोर उभारलेला भला मोठा शामियाना आंदोलकांना बसण्यासाठी अपुरा पडत असून रस्त्यावर तळपत्या उन्हात शेकडो आंदोलक बसले आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू होऊन 4 दिवस झाले  असून चौथ्या दिवशी रोपळे जि.प.गटातील रोपळे,मेंढापूर,तुंगत,देगाव, अजनसोंड, नारायण चिंचोली, आढीव, बाभुळगाव आदी गावांतील दिड हजारांवर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती. ‘आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापाच, एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. चौथ्या दिवशी काँग्रेस आय, रिपाइं ( आठवले गट ) अखिल भारतीय मेडिकल असो.  सांगोला तालुका संभाजी ब्रिगेड या संघटनांनी आंदोलनास भेट देऊन पाठींबा दर्शवला. नारायण चिंचोली, देगाव या ग्रामपंचायतींच्यावतीने मराठा आरक्षणाच्या पाठिंब्याचे ठराव करून आणले होते. ते यावेळी आंदोलनाचे समन्वयवक मोहन अनपट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आ. भारत भालके, आ. दत्तात्रय सावंत, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, युवा उद्योगजक अभिजित पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी भेट दिली. आणि दुपारपर्यंत आंदोलन स्थळी हे नेते बसून होते. 

दरम्यान सकाळी 11 वाजता पंढरपूर शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते  माजी आ. भाई राऊळ पुतळ्यापर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आली होती. या सुमारे 1 कि.मी. लांबीच्या या साखळीत सर्व जाती, धर्मातील अबाल वृद्ध सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून या साखळीची सुरुवात झाली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत  नेण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाई राऊळ पुतळ्यापर्यंत ही साखळी पोहोचली होती. दुपारी 12 वाजता राष्ट्रगीत गाऊन समाप्त करण्यात आली. या मानवी साखळीमुळे स्टेशन रोडचा , उजव्या बाजूचा रस्ता  12 वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. 

आंदोलन सुरू होऊन 4 दिवस झाले असले तरी अद्याप शासनाचा एकही प्रतिनिधी आंदोलनाकडे फिरकला नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख पंढरपुरात येऊनही आंदोलनाकडे फिरकले नाहीत. तर जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्यापैकी कुणीही आंदोलनाकडे फिरकले नाही त्यामुळे शहर आणि तालुक्यातील आंदोलक संतप्त झाले आहेत. तसेच आंदोलन अधिक व्यापक आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे.