Wed, Apr 24, 2019 21:34होमपेज › Solapur › नीरव मोदीला कर्ज मिळालेच कसे

नीरव मोदीला कर्ज मिळालेच कसे

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 11:09PMसोलापूर : प्रतिनिधी 

विविध बँकांचा डिफॉल्टर असतानाही नीरव मोदीला बँकेकडून कर्ज मिळालेच कसे, मागासवर्गीय महामंडळाकडून कर्ज मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना बँकेकडून अनेकदा त्रास होतो. विजय मल्ल्या, नीरव मोदीसारख्या डिफॉल्टर खातेदारास कर्ज देणार्‍या बँक अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही संबंध नसल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

ना. आठवले रविवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते. दुपारी बारा वाजता पांजरापोळ चौकातील हॉटेल राज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आरपीआयचे राज्याचे नेते राजाभाऊ सरवदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी ना. आठवले म्हणाले, दलित व मराठा समाजात फूट पाडण्याचे राजकारण होत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. मूळ आरक्षणाला धक्‍का न लागता अन्य समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. जोपर्यंत जाती जिवंत आहेत, तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षणाची प्रक्रियाच योग्य ठरणारी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशीच आपली भूमिका आहे. 

शिवाजी महाराजांच्या काळात सर्व जाती-धर्मातील मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. तो इतिहास डोळ्यासमोर ठेवून दलित व मराठा समाजाने एकत्रित राहणे गरजेचे आहे. अत्याचार करणार्‍याला जात नसते, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, अशा आरोपींचे हात- पाय तोडण्यापर्यंत शिक्षा व्हावी, अशीच आपली भूमिका आहे. भीमा कोरेगाव प्रकरण पूर्वनियोजित घडवून दलित व मराठा समाजात फूट पाडण्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणानंतर रस्त्यावर आलेल्या हजारो दलित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आल्याने या प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची सूचना पोलिसांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना व भाजपा एकत्रित यावे, अशीच भूमिका माझी आहे. दोन्ही पक्ष 2019 च्या निवडणुकीत एकत्रित येतील, अशी आशा आहे. यापुढील निवडणुकीनंतरही मोदी हेच पंतप्रधान असणार असून आपणही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदावर असणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. सामाजिक न्याय विभागाला मोदींनी तब्बल 56 हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर केला आहे. काँग्रेसपेक्षा जास्त विकासकामे आता होत आहेत. सोलापूर, माढा, रामटेक, मुंबई आदी ठिकाणच्या लोकसभा मतदारसंघातून शक्य झाल्यास मी निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तीनवेळा तलाकच्या विरोधात मोदी सरकार विधेयक आणत आहे, मात्र काँग्रेस यास आडकाठी आणत आहे, काँग्रेसच मुस्लिम महिलांच्या हिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अयोध्यात असलेल्या 65 एकर जागेत मंदिर व मस्जिद बांधण्याबाबत सकारात्मक तोडगा निघेल, अशा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. मोदी सरकार आरक्षण रद्द करणार नाही आणि असे झाले तर आम्ही सरकार बदलू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.