Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Solapur › होटगी मठाचे योगीराजेंद्र शिवाचार्य यांचे निधन

होटगी मठाचे योगीराजेंद्र शिवाचार्य यांचे निधन

Published On: Dec 22 2017 1:30AM | Last Updated: Dec 21 2017 9:17PM

बुकमार्क करा

होटगी : प्रतिनिधी 

लाखो वीरशैव भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि होटगी मठाचे मठाधिपती तपोरत्नं श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे बुधवारी अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठात लिंगैक्य झाले. ते 90 वर्षांचे होते. शुक्रवारी जगद्गुरूंच्या सान्निध्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

होटगी मठाचे पूज्य चन्नवीर शिवाचार्य लिंगैक्य झाल्यावर उत्तराधिकारी म्हणून योगीराजेंद्र शिवाचार्य यांचा होटगी मठाचे मठाधिपती म्हणून पट्टाभिषेक सोहळा झाला होता. सोलापूर येथील बाळी वेस मठात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त हजारो भक्तांच्या उपस्थितीत शिवलिंग पूजेचा सोहळा होत असे. श्रावण महिन्यात होटगी मठात त्यांच्या तपोनुष्ठान सोहळ्यालाही भाविकांची गर्दी होत असे. 

होटगी  व बाळी वेस येथील होटगी मठानंतर तपोरत्नं श्री योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी अक्कलकोट रोडवर वीरतपस्वी बृहन्मठ उभारला. दाक्षिणात्य पद्धतीचे महाद्वार उभे करून त्यांनी एक वेगळी वास्तुरचना उभी करून सोलापूरच्या वैभवात भर घातली. याच मठात धर्मसंस्कार वृद्धीसाठी रुद्रपठण, होमहवन, पूजाविधी, श्रावण मासानिमित्त इष्टलिंग पूजा, अय्याचार दीक्षा देऊन हजारो बटूंना घडवले. 

जिल्ह्यात शैक्षणिक संस्था सुरू करून त्यांनी तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच भक्तांवर शोककळा पसरली. बुधवारी रात्रीपासूनच भाविकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.