होमपेज › Solapur › शिक्षकांना स्फूर्ती देण्यासाठी सन्मान अवश्यक : वाघमारे

शिक्षकांना स्फूर्ती देण्यासाठी सन्मान अवश्यक : वाघमारे

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 8:12PMकरकंब : वार्ताहर

शालेय मुलांना ज्याप्रमाणे शाब्बासकीची थाप दिली की तो  उत्साहाने  अभ्यास करून अधिक गुण मिळवतो. त्याप्रमाणे शिक्षकांनाही स्फूर्ती देण्यासाठी पुरस्काराने सन्मानित करणे गरजेचे आहे,  असे मत विधान मंडळाचे माहिती व संशोधन अधिकारी बाबा वाघमारे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्यावतीने स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे प्रदेश सचिव आ. दत्तात्रय सावंत होते. याप्रसंगी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, प्राचार्य बी. पी. रोंगे, जी. एस. आप्पा पाटील  आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना बाबा वाघमारे म्हणाले,  शिक्षकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी अधिकार्‍यांना आपले करून शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे पोटतिडकीने प्रयत्न करतात. त्यामुळे शिक्षकांना एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे.  शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या साथीमुळे त्यांनाही  अधिक काम करण्यास बळ मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आपण शिकवित असलेल्या विषयात विद्यार्थ्यांने नैपुण्य मिळविले की आपल्याला पुरस्कार मिळाला असे शिक्षकांनी समजावे असेही आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन एकास राज्यस्तरीय आदर्श कृतिशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला, तर जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन आदर्श कृतिशील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक असे सात पुरस्कार देण्यात आले.

तसेच शालेय शिक्षण विभागामध्ये कार्यरत असणार्‍या व उत्कृष्ट सेवा करत असणार्‍या अधिका-यानाही आदर्श कृतिशील प्रशासकीय अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या प्राध्यापकांनाही राज्यस्तरीय आदर्श कृतिशील प्राध्यापक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आसबे यांनी केले.

Tags : Solapur, Honour,  necessary, inspiring, teachers