Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Solapur › तरुणाला लोखंडी सळई, काठीने मारहाण; 17 जणांवर गुन्हा दाखल

तरुणाला लोखंडी सळई, काठीने मारहाण; 17 जणांवर गुन्हा दाखल

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:32PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

मित्रांसोबत थांबलेल्या तरुणास लोखंडी सळई, काठी व दगडाने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी 17 जणांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुरलीधर चौकात घडली असून याबाबत मध्यस्थीचे प्रयत्न असफल झाल्याने अखेर याबाबत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत कोळेकर, सचिन काळे, शशीकांत   कोळेकर, रविकांत   कोळेकर, धर्मा कोळेकर, विनोद सावंत, किशोर कांबळे, किरण माने, किरण आरके, नितीन काळे, अक्षय काळे, गौतम सावंत, अमोल सावंत, रवी मस्के, रोहित चंदनशिवे, संतोष चंदनशिवे, सागर देडे (रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुनील विजय भंडारे (वय 22, रा. सिध्देश्‍वर हौसिंग सोसायटी, लष्कर, सोलापूर) याने फिर्याद दाखल केली आहे.  

सुनील भंडारे हा शनिवारी रात्री 11 च्या सुमारास मुरलीधर चौकात त्याच्या मित्रांसोबत थांबला असताना श्रीकांत कोळेकर व त्याच्या साथीदारांनी  भंडारे यास ‘इकडे ये रे’ असे बोलावले. त्यावेळी भंडारे याने काय झाले असे विचारले असता तुला लय मस्ती आली आहे, तुझी मस्ती जिरवतो म्हणून शिवीगाळ करुन, दमदाटी करुन काठी, लोखंडी सळई, दगडांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर भंडारे याच्या गल्लीतील लोकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रविवारी भंडारे हा पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेला होता.

 परंतु आपापसांत  मिटविण्यासाठी भंडारे याच्या समाजाचे प्रतिष्ठित पदाधिकारी अंजन कुमार म्हेत्रे व गौतम चंदनशिवे यांनी मध्यस्थी करुन तोडगा काढण्याचे ठरविले होते. त्याबाबत बैठका होऊन त्यामध्ये तोडगा न निघाल्याने अखेर भंडारे  याने बुधवारी याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.  पोलिस उपनिरीक्षक पठाण तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर दिवसभर चर्चा सुरु होती.