Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना मारहाण

वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना मारहाण

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 11:15PMमाढा : वार्ताहर

आमच्याच शेतीपंपांचा वीजपुरवठा सतत का बंद करता, अशी विचारणा करत उपळाई बुद्रुक (ता. माढा)  येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या दोन अभियंत्यांसह सहा कर्मचार्‍यांना स्थानिकांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. 

ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास वीज वितरण उपकेंद्रात घडली. याप्रकरणी उपळाई बुद्रुकचे सरपंच मनोज गायकवाड यांच्यासह नऊजणांवर माढा पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाण करणे, या आशयाचा गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा कर्मचार्‍यांच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर या गावातील विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल झाले.

यासंदर्भात माढा पोलिसांत प्रभारी उपकार्यकारी अभियंता आर.पी. चव्हाण यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार उपळाई बुद्रुकचे सरपंच मनोज गायकवाड यांनी भ्रमणध्वनीद्वारे माढा उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांना उपळाई बुद्रुक येथील लाईट का बंद करता म्हणून विचारणा केली. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण, सहायक अभियंता पी.एम. चव्हाण यांच्यासह हरणे, यमलवाड, सलगर, हजारे हे उपळाई बुद्रुक उपकेंद्र येथे गेले. त्यावेळी शेतकर्‍यांचा जमाव त्याठिकाणी जमला होता. 
उपस्थित शेतकर्‍यांनी इतर ठिकाणची वीज चालू असताना आमच्या कृषी पंपांची वीज नेहमीच का बंद करता म्हणून शिवागाळ सुरू केली. सरपंच मनोज आप्पाराव गायकवाड, लक्ष्मण चांगदेव जाधव, शंकर शिवाजी गोरे, सिध्देश्‍वर आप्पाराव शेलार, बाळू विठ्ठल माळी, पप्पू महादेव डुचाळ, ज्ञानदेव चांगदेव राऊत, बाळू तुकाराम डुचाळ, सुनील क्षीरसागर (माळी) यांचा मुलगा यांनी अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने व काठ्याने मारहाण केली. या मारहाणीत सहायक अभियंता प्रेमनाथ माणिक चव्हाण हे जागीच बेशुद्ध पडले.

 प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी सोलापूर महावितरण मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्‍वर पडळकर व बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ताडे यांनी भेट दिली.

पिके जळू लागल्याने शेतकरी संतप्‍त
वीज वितरण कंपनीकडून सतत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामागे अनेक कारणे असली तरी सतत वीज खंडित होत असल्याने पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रहार संघटनेचे नेते अतुल खुपसे-पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच वीज वितरणचे कार्यालय जाळून टाकण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले होते. त्यातच उपळाईत मारहाणीची घटना घडल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.