होमपेज › Solapur › हिंदू लिंगायतांना ओबीसीचे आरक्षण देण्यातील त्रुटी दूर करू

हिंदू लिंगायतांना ओबीसीचे आरक्षण देण्यातील त्रुटी दूर करू

Published On: Apr 27 2018 11:01PM | Last Updated: Apr 27 2018 11:01PMसोलापूर ः प्रतिनिधी

हिंदू लिंगायत समाजातील सर्वांना ओबीसीचे आरक्षण देण्याबाबत इतर मागासर्गीय आयोगाकडे शिफारस केली जाईल. आरक्षण देण्यात येणार्‍या त्रुटी दूर करून या समाजाला आरक्षण देण्यात येईल. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्‍वरांचा पुतळा उभारण्यासाठी येत्या 15 दिवसांच्या आत योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने संकल्पसिद्धी उपक्रमात शुक्रवारी सकाळी अक्‍कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिराच्या प्रांगणातील श्रीशैल पीठाचे लिंगोद्भव जगद‍्गुरू  श्री 1008 पंडिताराध्य यांच्या 108 फुटी मूर्तीचे अनावरण व 1008 शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व काशी जगद‍्गुरू श्री डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य,श्रीशैल जगद‍्गुरू डॉ. चन्‍नसिध्दाराम पंडिताराध्य शिवाचार्य व उज्जैन जगद‍्गुरू श्री सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य यांच्या सान्निध्यात करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, होटगी मठाचे मठाधिकारी डॉ. मल्‍लिकार्जुन शिवाचार्य, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, आ. प्रशांत परिचारक, महापौर शोभा बनशेट्टी आदींसह राज्यभरातील व कर्नाटकातील शिवाचार्यगण उपस्थित होते. 

प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी लिंगायत समाजाच्या दाखल्यांवर हिंदू लिंगायत असे आढळून येते. हिंदू लिंगायत जातीच्या दाखल्यांसाठी इतर मागासवर्गीयांचे आरक्षण देण्यात यावे व मंगळवेढा तालुक्यातील महात्मा बसवेश्‍वरांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामास निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे भाषणात केली. प्रांरभी संकल्पसिध्दी कार्यमहोत्सवाचे कार्याध्यक्ष आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. 

होटगी मठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्‍लिकार्जुन शिवाचार्य म्हणाले, संकल्पसिद्धी कार्यक्रम पूर्ण व्हावा यासाठी होटगी मठाचे तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी अडीच वर्षे केवळ पाण्यावर उपवास केला. भक्‍तांच्या सहकार्याने आज त्यांचा संकल्प पूर्ण होताना आनंद होत आहे. मरेपर्यंत योगीराजेंद्र यांनी आपला संकल्प सोडला नव्हता. मुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमास यावे, अशी त्यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली आहे. पंतप्रधानही या संस्थेत यावेत, अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छाही पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. 

ग्रामविकासमंत्री ना. मुंडे म्हणाल्या की, पवित्र ठिकाणी येण्याची संधी मिळाल्याचे समाधान होत आहे. आई- वडिलांवर मुलीच्या शिक्षणाचे व लग्‍नाचे दडपण असते. हे दडपण होटगी मठाने दूर केले आहे. पालकमंत्र्यांनी केलेल्या मागणीला आपला पाठिंबा असून मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. सोलापूरकरांचे मुंडे यांच्यावर प्रेम होते. आजही ते प्रेम दिसून येते, अशी भावना त्यांनी व्यक्‍त केली. 

यावेळी  संकल्पसिद्धी कार्यमहोत्सवाच्या विशेष अकांचे प्रकाशन करण्यात आले. तीनही जगद‍्गुरू व शिवाचार्यांच्या उपस्थितीत यावेळी सामुदायिक विवाह सोहळ्यातील दाम्पत्यांवर अक्षतांचा वर्षाव करुन त्यांच्या नवआयुष्याला शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास हजारो भाविकांनी गर्दी केली होती.