Thu, Apr 25, 2019 21:43होमपेज › Solapur › सदोष वीज बिल प्रणालीवर महावितरणचा हायटेक उपचार

सदोष वीज बिल प्रणालीवर महावितरणचा हायटेक उपचार

Published On: Aug 10 2018 11:56PM | Last Updated: Aug 10 2018 10:56PMमहावितरण : बाळासाहेब मागाडे

ग्राहक हितासाठी महावितरणकडून सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. असे असले तरी महावितरणच्या विज बिल प्रणालीच्या भोंगळ कारभाराचा अनेकांना नेहमीच फटका बसत असतो.  वीज बिले वेळेत न मिळणे, सदोष वीज बिले, बिल भरूनही पुन्हा नव्या बिलात जुन्या येणेबाकीचा समावेश आदी असंख्य कारणांमुळे ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागतो. यावर मात करण्यासाठी राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीज बिल मिळावे तसेच ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा याकरिता महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे शहरी भागात 48 तासांत आणि ग्रामीण भागात 72 तासांत वीज बिल वितरित करण्यात येईल.  देशात असा प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल, असा दावा महावितरणने केला आहे. 

सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीज बिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 7 ते 8 दिवसांचा काळ जातो. ग्राहकांना वेळेत वीज बिल न मिळाल्यामुळे त्वरित देयक प्रदान दिनांक अंतर्गत मिळणारी सूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळण्यास ग्राहकांना अडचणी येतात. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीज बिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर महावितरणचे प्रभावी नियंत्रण राहात नाही. परिणामी ग्राहकांच्या डोकेदुखीत वाढ होत असते. यावर मात करण्यासाठी महावितरणच्यावतीने केंद्रीय पध्दतीने वीज बिलाची छपाई व वितरण करण्यात येणार आहे. मोबाईल मीटर रिडिंगमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाईम) मीटरवाचन तसेच चेक रिडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पध्दतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक वीज देयक मिळेल तसेच त्यांना वीज देयक भरण्यासाठी अधिकचा कालावधी मिळाल्यामुळे वीज देयक भरणा केंद्रातील रांगा कमी होतील व देयक भरणे अधिक सोयीचे होईल. त्या त्या विभागाकडून प्राप्त झालेल्या रिडिंगनुसार मुख्यालयातील सर्व्हरवर बिल तयार करण्यात येणार आहे. हे बिल परिमंडल स्तरावर वीज बिल वितरणासाठी नियुक्त करण्यात येणार्‍या एजन्सीकडे 24 तासांत पाठविण्यात येईल. त्यानंतर या एजन्सीकडून वीज बिल शहरी भागात 48 तासांत आणि ग्रामीण भागात 72 तासांत वितरित करण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीज बिल न देणार्‍या एजन्सींना दंड आकरण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना वेळेत वीज बिल मिळून प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटचा लाभ घेता येईल. एकूणच या हायटेक पद्धतीमुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळेल शिवाय बिलिंग, छपाई व वितरण खर्चात मोठी बचत होणार आहे. बिलिंग तक्रारीच्या प्रमाणात घट होईल, अशी आशा करायला हरकत नाही.