होमपेज › Solapur › श्रमिकांच्या घरांचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करणार

श्रमिकांच्या घरांचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करणार

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 11:23PM सोलापूर ः  प्रतिनिधी

असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या 30 हजार श्रमिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून एक जिल्हाधिकारी या नात्याने प्रशासकीय पातळीवरील सर्व कामकाजात सर्वतोपरी मदत करणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

कुंभारी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारातून ‘रे’नगर फेडरेशननामक 30 हजार घरकुलांच्या भूमिपूजनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी  महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे होते. यावेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, कुंभारीचे सरपंच सिद्धराम इमडे व उपसरपंच आप्पासाहेब बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.  जिल्हाधिकारी डॉ.  भोसले पुढे म्हणाले की, या योजनेसाठी जागा, विविध परवाने, रस्ते, यासारख्या महत्त्वाच्या घटकांसाठी विशेष बांधकाम कक्ष, एक खिडकी परवाना यासारख्या सेवा तत्परतेने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. या श्रमिकांच्या पाठीमागे एक नि:स्पृह लढवय्या नरसय्या आडम मास्तरांसारखे खंबीर नेतृत्व आहे. यामुळेच श्रमिकांच्या घरांचे स्वप्न निश्‍चितपणे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.  

डॉ. ढाकणे म्हणाले की, 70 च्या दशकात सोलापूर शहराचा महाराष्ट्रात 4 था क्रमांक होता. दुर्दैवाने अनेक गिरण्या बंद पडल्या,  कारखाने अडचणीत येऊन बेरोजगारीची लाट निर्माण झाली.  त्यामुळे सोलापूर शहर मागे राहिले. परंतु श्रमिकांच्या वेदना तडफेने मांडणारे आडम मास्तरांसारखे लोकप्रतिनिधी असल्यामुळेच हा 30 हजार घरकुलांचा प्रकल्प पूर्ण होत आहे. या 30 हजार घरकुलांची उभारणी झाल्यानंतर येथील लोकांना रोजगार मिळण्यासंबंधी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त या नात्याने प्रयत्न करणार. नुसते घरच नाही तर हाताला काम दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

पोलिस आयुक्त  तांबडे म्हणाले की, कोणत्याही चांगल्या कामांना जास्तीत जास्त विघ्ने येतात. या विघ्नांवर चालून गेल्याशिवाय यश मिळत नाही. 

प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम (मास्तर) म्हणाले की, मागील आठ वर्षांचा संघर्ष आणि यादरम्यान केलेल्या मोर्चा, आंदोलने, धरणे, रास्ता रोको, ठिय्या, शिष्टमंडळे, बैठका, चर्चा करताकरता आठ वर्षांचा कालखंड गेला. मोठ्या जिद्दीने सर्व कामगारांच्या जोरावर शासनाला असंघटित कामगारांच्या 30 हजार घरकुलांचा महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प अनुदानासह मंजुरी देण्यास भाग पाडले. ही योजना केवळ झोपडपट्टीधारकांसाठी असताना कॉ. सीताराम येचुरी, सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार असंघटित कामगारांना लाभ देण्याचा निर्धार केला गेला. परंतु हे प्रकल्प होऊ नये म्हणून ज्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले त्यांच्यामुळे गोरगरिबांचे 450 कोटी रुपयांचे नुकसान झाले. परंतु मुख्यमंत्री यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पाला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. येत्या डिसेंबरअखेरीस 10 हजार घरकुले बांधून तयार होणार आहेत. लवकरच याठिकाणी पंतप्रधानांना निमंत्रित करणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी माकपचे जिल्हा सचिव एम.एच. शेख, फेडरेशनचे सेक्रेटरी युसूफ शेख (मेजर) यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ‘रे’नगर फेडरेशनचे चेअरमन नलिनीताई कलबुर्गी यांनी मांडले. 

याप्रसंगी व्यासपीठावर विधी सल्लागार विजय मराठे, नगसेविका कामिनीताई आडम, उपसरपंच आप्पासाहेब बिराजदार, रोहिणी पंधे, अंकुर पंधे, अमोल मेहता, यशोदा दंडी आदी उपस्थित होते.  सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केले, तर आभार मुरलीधर सुंचू यांनी मानले.