Sat, Apr 20, 2019 08:06होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांच्या बंगला बांधकामप्रकरणी आज सुनावणी

सहकारमंत्र्यांच्या बंगला बांधकामप्रकरणी आज सुनावणी

Published On: Jul 24 2018 11:28PM | Last Updated: Jul 24 2018 11:22PMसोलापूर ः प्रतिनिधी

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महानगरपालिकेच्या होटगी रस्त्यावरील आरक्षित जागेवर आलिशान बंगला बांधल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. या खटल्याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या महिन्यात या याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित असताना सुनावणी लांबणीवर पडल्याने 25 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. अग्‍निशमन केंद्र आणि व्यापारी गाळ्यांसाठी राखीव असलेल्या होटगी रस्त्यावरील जागेवर मंत्री सुभाष देशमुख यांनी बंगला बांधल्याचा अहवाल महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात सादर केला होता. या अहवालामुळे सहकारमंत्री देशमुख चांगलेच अडचणीत सापडले असून विरोधकांनीही यावर आवाज उठविल्यामुळे देशमुखांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. 

बांधकाम अवैध असून त्याचा परवाना मागे घेतल्याचा अहवाल मनपा आयुक्‍त अविनाश ढाकणे यांनी न्यायालयात सादर केला होता. या याचिकेवर 13 जून रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते; मात्र सुनावणीसाठी न्यायपीठासमोर 42 याचिकांवरच सुनावणी  होऊ शकली. सहकारमंत्र्यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी 48 क्रमांक पडला. त्यामुळे ही याचिका बोर्डावर आलीच नाही. त्यामुळे न्यायपीठाने सुनावणीसाठी 25 जुलै ही तारीख निश्‍चित केली होती.