होमपेज › Solapur › आषाढीसाठी आरोग्य विभागाची युद्धपातळीवर तयारी

आषाढीसाठी आरोग्य विभागाची युद्धपातळीवर तयारी

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 9:39PMसोलापूर : प्रतिनिधी

पंढरपूर येथे जुलै महिन्यात होत असलेल्या आषाढी यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली असून जबाबदार्‍या निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 

तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे 23 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे. आषाढीसाठी दरवर्षी 12 लाखांहून अधिक वारकरी यात सहभागी होत असतात. यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच पाऊस चांगला झाल्याने शेतकरी आनंदी आहे. त्यामुळे यंदाच्या वारीसाठी तुलनेत जास्त वारकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक व उपचारात्मक पद्धतीने देण्यात येत असलेल्या आरोग्य सेवांसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर जबाबदार्‍या निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये इन्सिडेंट कमांडर (उपजिल्हाधिकारी) यांच्या अंतर्गत डेप्युटी इन्सिडेंट कमांडर  (तालुकास्तरीय अधिकारी), त्यांच्या खालोखाल डेप्युटी इन्सिडेंट कमांडर यांच्या समन्वयासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात  आली आहे. तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला व पुरुष), तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्य पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आलेत.

नियंत्रण कक्षाची स्थापना

आषाढी पालखी सोहळ्यासाठी जिल्हा स्तरावर नियमित नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहणार असून 0217-2726578 असा संपर्क क्रमांक आहे. तालुका स्तरावर पंढरपूर (02186-226451) व माळशिरस (02185-236342) असे नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत रुग्णसेवेसाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची मदत घेण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर तपासण्यासाठी अधिकार्‍यांवर जबाबदारी असून बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संपर्कासाठी वॉकीटॉकी वापरण्यात येणार आहे.