होमपेज › Solapur › वादळी पावसाचा तडाखा

वादळी पावसाचा तडाखा

Published On: May 23 2018 12:10AM | Last Updated: May 22 2018 11:53PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

शहर व तालुक्यात सोमवारी रात्री 8 वा.च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 22 गावांतील 152 घरांवरील पत्रे उडून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. सुमारे 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात चोहोकडे पाणीच पाणी झाले होते.  तर स्टेशन रोड व वासूद रोडवरील गटारी तुंबल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले.  तालुक्यातील 22 गावातील 152 घरावरील पत्रे उडून कुटुंब बेघर झाली आहेत.  तालुक्यात 9 मंडलनिहाय 73 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ज्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत अशा कुटुंबांचे पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार संजय पाटील यांनी दिले आहेत. 

सोमवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यात वादळी  वार्‍यासह जोरदार पावसाचे आगमन झाले.  मान्सूनपूर्व पावसामुळे सांगोला-मंगळवेढा रोडवरील सुरवसे पेट्रोल पंपाजवळ लिंबाचा वृक्ष उन्मळून पडल्याने जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तासानंतर जेसीबीद्वारे उन्मळून पडलेला वृक्ष बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. जवळपास दोन-अडीच तास रस्त्यावर ताटखळत रहावे लागल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल संताप व्यक्‍त केला. जुजारपूर येथील घरांवरील पत्रे उडून गेल्याने मारुती गाडे जखमी झाले. तर उदनवाडी, झापाचीवाडी, तिप्पेहाळी, लोणविरे, बामणी, धायटी, येथील प्रत्येकी 1 घरावरील जुनोनी 2, काळुबाळूवाडी 3, डोंगरगांव 3, सोनंद 5, कडलास 5, बुरंगेवाडी 30, जवळा 40, भोपसेवाडी 11, आगलावेवाडी 25, तरंगेवाडी 2, सोनलवाडी 2, एखतपूर 3, कमलापूर 5, सांगोला 4, वासूद 5, अशा 152 घरावरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबाचे नुकसान झाले आहे.

जवळा-कडलास रोडवरील देशमुख वस्तीजवळ वृक्ष उन्मळून पडल्याने जवळपास 10 तास वाहतूक ठप्प झाली होती. घेरडी, जवळा, भोपसेवाडी, आगलावेवाडी येथे वीजेच्या तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरात तब्बल 18 तासांनी वीज आली,  परंतू अर्ध्या तासात पुन्हा गायब झाली. उपनगरातील रेल्वे लाईनच्या पश्चिम भागात दु.4 नंतरही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.  वादळी वार्‍याचा जोरदार फटका वीज वितरण कंपनीला बसला असून शहर व तालुक्यात रात्रभर वीज गुल झाली होती. वीजेअभावी फॅन, कुलर, ए.सी., बंद असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्यास सामोरे जावे लागले.