Wed, Mar 27, 2019 00:05होमपेज › Solapur › पत्नी, मुलीचा खून; तरुणाची आत्महत्या

पत्नी, मुलीचा खून; तरुणाची आत्महत्या

Published On: May 02 2018 10:49PM | Last Updated: May 02 2018 10:36PMहंजगी : प्रतिनिधी

अक्कलकोट  तालुक्यातील बोरगाव दे. येथे पत्नी व मुलगी यांचा खून करून तरुणाने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास मृतदेह आढळून आले.

सतीश भीमशा बंदीछोडे (वय 35), पत्नी   अंदवा (25)  व  मुलगी  वेदिका (3, सर्व रा. बोरगाव  दे.) अशी मृतांची नावे आहेत. घरगुती वादाचे पर्यवसान या भीषण प्रकारात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकारने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी उलटसुलट चर्चा सुरू होती.

याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून  मिळालेली  माहिती अशी  की, सतीश  हा पुणे येथे 16 वर्षांपासून नामांकित कंपनीत कामाला  होता. रविवारी सकाळी तो बोरगावला येणार होता म्हणून फोन केला होता. त्यानंतर तो बोरगाव येथे स्वतःच्या शेतात पोहोचला. सोबत पत्नी अंदवा व लहान मुलगी वेदिका यांना  घेऊन  शेतात गेला. शेतात असणार्‍या लिंबाच्या झाडाखाली असणार्‍या छोटेखानी लक्ष्मी (देवी) मंदिराजवळ येऊन पत्नी  अंदवा हिस टॉवेलने गळा आवळून मारले व त्यानंतर पोटच्या लहान वेदिकास हिला संपवले. त्यानंतर  स्वतः सतीश याने लिंबाच्या झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या  केली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

मंगळवारी  दुपारी एकच्या सुमारास   हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यावेळी नागरिकांनी अक्कलकोट उत्तरच्या पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत होते. तीनही मृतदेहांची परिसरात दुर्गंधी पसरली होती. या क्रूर घटनेमुळे बोरगाव व परिसरात दिवसभर शोककळा पसरली होती. घटनास्थळी बघ्यांची मृतदेह पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 

याबाबत ललिता भीमाशंकर घोडके (रा. बोरगाव दे, ता. अक्कलकोट) यांच्या फिर्यादीवरून मृत सतीश बंदीछोडे याच्याविरुद्ध  अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.   
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतमकुमार यावलकर, पोलिस  निरीक्षक सूरज बंडगर,  सहायक  पोलिस निरीक्षक दीपक जाधव आदींनी भेट देऊन पाहणी केली. या  खुनाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, हवालदार यामाजी चव्हाण हे करीत आहेत.