Wed, Jul 24, 2019 13:01होमपेज › Solapur › सत्ताधारी भाजप-सेना दोघेही खोटे बोलतात : अजित पवार

सत्ताधारी भाजप-सेना दोघेही खोटे बोलतात : अजित पवार

Published On: Apr 08 2018 10:19PM | Last Updated: Apr 08 2018 9:37PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी 

सत्ताधारी भाजप आणि सेना दोघेही खोटे बोलतात. मागे ज्या चुका झाल्या, त्या आता होऊ देऊ नका. यावेळी जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून द्या, असे म्हणत रश्मी बागल यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. पण गाफील राहिलात तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरला.
 कुर्डुवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हल्लाबोल आंदोलनात अजित पवार बोलत होते. पुढे पवार म्हणाले, शिवसेना सत्तेत आहे की बाहेर विरोधकाचीही भूमिका बजावते पण सत्ता सोडण्याचे धाडस नाही. शेजारच्या राज्यात पेट्रोल 10 रूपयांनी स्वस्त आहे. आज हवा बदलली आहे. वातावरण बदलत आहे. सर्व पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होतोय. हे सरकार खोटं बोलतयं, हे आता जनतेला पटायला लागलयं, यापुढील काळात राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन  त्यांनी यावेळी केले.

यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी राज्यमंत्री दिलीप सोपल, आ. बबनदादा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, मा.खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, युवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम कोते-पाटील, उमेश पाटील, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आ. जयदेव गायकवाड, जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल, सुभाष गुळवे, दिग्विजय बागल, दत्ता गवळी, श्रीकांत शेंडगे आदी उपस्थित होते.

 यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, पवार यांनी दिलेली कर्जमाफी ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. या सरकारची उन्हाची चार वर्षे संपली आहेत, आता सुखाचा पाऊस येणार आहे. गेल्या चारवर्षात 15 लाख नव्हे तर 15 पैसे सुद्धा खात्यावर जमा झाले नाहीत. लोकांसमोर बोलता येत नाही म्हणून मन की बातमध्ये बोलतात. ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्यांनी हजारो कोटींची कर्जे  घेऊन  देश सोडला. त्यामुळे आपल्याच डोक्यावर 15 लाखांचे कर्ज वाढले. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने नोटाबंदी केली.पण नोटाबंदीचा त्रास सामान्यांनाच झाला. राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार आणण्यासाठी भाजपचा सिंहाचा वाटा आहे. त्या तरुणाईला यांनी फसवले. यावेळी दीपक साळुंके, उमेश पाटील, दत्ता गवळी, रश्मी बागल आदींची भाषणे झाली. सभेपूर्वी वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. सभेच्या वेळेसही रिमझिम पाऊस सुरु होता. अशा पावसातही लोकांनी जागा सोडली नाही. सभेला हजारो लोकांनी गर्दी केली होती.