Tue, Apr 23, 2019 23:31होमपेज › Solapur › झाडाला ठोकलेले अर्धा किलो खिळे काढले

झाडाला ठोकलेले अर्धा किलो खिळे काढले

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 10:30PMसोलापूर : प्रतिनिधी 

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्यावतीने शहरात खिळेमुक्त झाडांचा अनोखा उपक्रम मंगळवारी राबविण्यात आला. मंगळवारी सकाळी दोन तासात विविध झाडांना मारलेले अर्धा किलो खिळे काढण्यात आले. खिळेमुक्त झाडे नेलफ्री ट्री- पेनफ्री ट्री या उपक्रमामुळे शहरातील झाडे खिळेमुक्त होतील, असा विश्‍वास श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी व्यक्त केला. 

   या उपक्रमास शहरातील विविध भागातून सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजपासून सुरू केलेल्या या उपक्रमात पहिल्या दिवसांत सोलापूरमध्ये शेळगी परिसरात स्टेट बँक कॉलनी, दयानंद कॉलेज, प्रियंका चौक, तुळजापूर नाका, हैदराबाद रोड या विविध ठिकाणी झाडांना मारलेले खिळे काढण्यात आले. शहरात असलेल्या झाडांचे आयुष्य वाढवणे आहे. कारण झाडांना खिळे मारणे, त्यांना दोरी, वाळवी लागणे किंवा तारांनी बांधणे यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते, असे समोर आले आहे. या चळवळीमुळे झाडांच्या वेदना कमी तर होणारच आहेत परंतु स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या उपक्रमालाही हातभार लागणार आहे. 

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्याप्रमाणात झाडांची वाढ होताना दिसत नाही. उभी असलेली झाडेही टिकण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. झाडांना खिळे मारणे, त्यांना दोरी किंवा तारांनी बांधणे, यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते. याचमुळे आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. वाळवी लागलेल्या झाडांना फवारणी, तर वाळवी लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात येणार आहे. अखेर झाडही एक सजीव असून त्यालाही समजून घेतले पाहिजे.  हा उपक्रम श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.    

या उपक्रमामध्ये प्रशांत हिबारे, गणेश येळमेली, युवराज येलशेट्टी, समर्थ ओझा, शुभम हंचाटे, सचिन हुंडेकरी या अभियानात सहभागी झाले होते. यावेळी खिळेमुक्त झाडे झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जवळपास आज सकाळी  अर्धा किलो खिळे काढण्यात आले.