Thu, Jun 20, 2019 00:59होमपेज › Solapur › गारपीटग्रस्त पिकांची पालकमंत्र्यांकडून पाहणी

गारपीटग्रस्त पिकांची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Published On: May 01 2018 1:18AM | Last Updated: Apr 30 2018 11:52PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

गारपीट व वादळी वार्‍याच्या तडाख्यात शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेल्या बेंबळे येथील पिकांची पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. बबनराव शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली. मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसनमंत्री  चंद्रकांत पाटील यांना नुकसानीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन ना. देशमुख यांनी शेतकर्‍यांना दिले. 17 एप्रिल रोजी  बेंबळे व परिसरात वादळी वार्‍याने व प्रचंड प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे केळी, डाळिंब, ऊस, टोमॅटो, द्राक्षे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

या गारपीटग्रस्त बेंबळे येथील पिकांची पाहणी करण्यासाठी ना. देशमुख, आ. शिंदे आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिलासा देत ठोस मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.यावेळी  दादासाहेब साठे, कृषी आत्मा समितीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, प्रांत एम.बी. बोरकर, तहसीलदार सदाशिव पडदुने, जि. कृषी अधिकारी ए.सी. बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, रत्नाकर कुलकर्णी, मुकुंद रामदासी, सतीश चव्हाण, ता. कृषी अधिकारी शरद सोनवणे, कृषी मंडल अधिकारी दत्तात्रय भोंगळे, मंडल अधिकारी पी.के. बांगर, कृषी सहाय्यक गणेश भोंग, भारत बोंगाणे, तलाठी एस.एस. कांबळे, तलाठी प्रशांत जाधव उपस्थित होते. 

पालकमंत्र्यांनी संपूर्ण नुकसानग्रस्त पिकांची, पडझड झालेल्या घरांची  पाहणी केली. यानंतर संबंधित शेतकरी व मजुरांशी संवाद साधला. यावेळी शेतकर्‍यांनी तहसीलदार यांनी शासनाकडे पाठवलेल्या अहवाल व  नुकसान  भरपाईच्या आकडेवारीबाबत नाराजी व्यक्त केली. यावर पालकमंत्री देशमुख म्हणाले की, प्रशासनाने केलेला पंचनामा व शासनाकडे  मागणी केलेली मदत तूटपुंजी आहे. कारण केळी, डाळिंब आणि इतर सर्व पिकांना लागणारा खर्च हा जास्त आहे. मिळणारे उत्पन्न हातातून गेले. त्यामुळे हेक्टरी 13 हजार 500 रुपये ही रक्कम अतिशय तोकडी आहे. बेंबळे परिसरातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पण ही बाब आ. बबनदादा व मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देणार आहोत. मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत  पाटील यांच्याकडून मदतीत वाढ करुन घेऊ, असे ठोस आश्‍वासन जमलेल्या शेतकर्‍यांना दिले.

यावेळी आ. बबनराव शिंदे यांनी वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. 12-13 दिवस झाले तरी वीज बंद असल्याने संतापलेल्या शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाबाबत संताप व्यक्त केला.

या दौर्‍यात  केळी उत्पादक सोमनाथ हुलगे, रामचंद्र भोसले, भारत भोसले, विलास भोसले, जयवंत भोसले, अर्जुन हुलगे, सचिन जगताप हे शेतकरी उपस्थित होते. त्यांनी बँकेच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. याबाबतचे सह्यांचे निवेदन प्रा. मोहन भोसले,  रविकिरण भोसले, सरपंचकल्पना भोसले, उपसरपंच अमर पवार, गोविंद भोसले, संजय पवार, महेश रामदासी, अशोक काळे, सतीश भोसले, बापू सुरवसे, बंकट काळे, सचिन जगताप, भारत भोसले, जयवंत देशमुख, गणेश हुलगे, मोहन भोसले यांनी दिले.