Fri, Jul 19, 2019 05:11होमपेज › Solapur › अभिषेकाच्या देणगीसाठी हब्बूंचे उपोषण सुरू

अभिषेकाच्या देणगीसाठी हब्बूंचे उपोषण सुरू

Published On: Aug 13 2018 11:40PM | Last Updated: Aug 13 2018 11:22PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्‍वर मंदिरातील पुजारी हब्बू यांनी अभिषेकाच्या देणगीची रक्कम मिळावी म्हणून ऐन श्रावण मासात मंदिरात चक्री उपोषण सुरु केले असल्याने खळबळ उडाली आहे.

सिध्देश्‍वर देवस्थान पंच कमिटी आणि मंदिरातील पुजारी हब्बू यांच्यातील वाद खूप जुना आहे. सोलापूरकरांसाठी पवित्र असेलल्या श्रावण महिन्यातच हा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे मंदिरात येणार्‍या हजारो भाविकांसमोर पंच कमिटी आणि हब्बू यांच्या वादाचा हा तमाशा रंगणार काय, अशी चर्चा श्रावणाच्या पहिल्याच दिवशी भाविकांमध्ये सुरु झाली आहे.

मंदिरातील देणगी पेटीवरून हब्बू आणि पंच कमिटी यांचा वाद जिल्हा  न्यायालयात गेला होता. त्यावेळी हब्बू यांच्याकडे असलेले पूजेचे हक्क न्यायालयाने अबाधित राखले होते. मात्र देणगी पेटीतील पैशाच्या रकमेचे हक्क मंदिर समितीकडे ठेवले होते. भाविकांकडून अभिषेक पूजेसाठी पावतीव्दारे मिळणार्‍या रकमेवर हब्बू यांनी हक्क सांगितला होता.त्यापोटी ऑगस्ट 2017 पासून मंदिर समितीकडून एक रुपयाही हब्बू यांना मिळाला नसल्याची माहिती आनंद हब्बू यांनी सांगितले.

मंदिर समितीकडून प्रत्यक्ष पूजा न करता मंदिराच्या कार्यालयातच अभिषेकाचा प्रसाद दिला असून त्यामुळे आमच्या पूजेच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोपही आनंद हब्बू यांनी केला. याबाबत प्रतिक्रिया देताना मंदिर समितीचे सदस्य गुंडप्पा कारभारी म्हणाले की, हा वाद खूप जुना असून भाविकांकडून दानपेटीत जमा होणार्‍या पैशावर हब्बूंचा डोळा आहे.

मंदिर समितीकडे जमा होणारा पैसा सामाजिक कामासाठी खर्च केला जातो. मात्र हब्बूंकडे जमा होणारी देणगीची रक्कम त्यांच्या चरितार्थासाठीच वापरली जाते. त्यामुळे याबाबत भाविकांनीच विचार करून मंदिर समितीकडेच देणगी द्यावी, असे आवाहनही कारभारी यांनी केले आहे.