Tue, Jul 23, 2019 02:09होमपेज › Solapur › सोलापुरात मुलींचीच बाजी, बारावीचा निकाल 89.36 टक्के 

सोलापुरात मुलींचीच बाजी, बारावीचा निकाल 89.36 टक्के 

Published On: May 30 2018 11:11PM | Last Updated: May 30 2018 11:07PM सोलापूर : प्रतिनिधी 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा नियमित परीक्षार्थींचा एकूण 89.36 टक्के इतका निकाल लागला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच परीक्षेत बाजी मारली असून मुलींचा निकाल 94.5 टक्के, तर मुलांचा निकाल 87.59 टक्के इतका लागला.  बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली गेली होती. एकनंतर पंधरा मिनिटांतच संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालकांनी सुस्कारा सोडला.

सोलापूर जिल्ह्याभरातून बारावीच्या परीक्षेसाठी नियमित व पुनर्परीक्षार्थी असे 31 हजार 831 विद्यार्थी व 21 हजार 156 विद्यार्थी अशा एकूण 52 हजार 987 परीक्षार्थींनी  नोंदणी केली होती. यापैकी 31 हजार 785 विद्यार्थी व 21 हजार 126 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 46 हजार 352 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 87.59 टक्के इतका लागला आहे. बारावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याभरातील 6 हजार 569 परीक्षार्थी नापास झाले असून या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा 17 जुलै रोजी पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना याच शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परीक्षा काळात कॉपीचा मार्ग अवलंबणार्‍या 

38 विद्यार्थ्यांचा निकाल न लागल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. बारावीच्या परीक्षेत शास्त्र शाखेतून 22 हजार 30 परीक्षार्थी होते. यापैकी 21 हजार 377 परीक्षार्थी उत्तीर्ण असून या शाखेचा निकाल 97.04 टक्के इतका लागला आहे. कला शाखेतून एकूण 19 हजार 912 परीक्षार्थी होते. यापैकी 15 हजार 913 परीक्षार्थी उत्तीर्ण असून या शाखेचा निकाल 79.92 टक्के इतका लागला आहे. वाणिज्य शाखेतून 7 हजार 393 परीक्षार्थी होते. यापैकी 6 हजार 870 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल 92.93 टक्के लागला आहे. एमसीव्हीसी शाखेतून 2 हजार 33 परीक्षार्थी होते. यापैकी 1 हजार 747 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल 85.64 टक्के निकाल लागला आहे.