Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Solapur › बार्शी : तांबेवाडीतील कॉपीच्या जुन्या व्हिडीओने खळबळ

बार्शी : तांबेवाडीतील कॉपीच्या जुन्या व्हिडीओने खळबळ

Published On: Feb 22 2018 10:26PM | Last Updated: Feb 22 2018 10:15PMवैराग ः प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील तांबेवाडी येथे इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. गुरुवारी पुन्हा एका वृत्तवाहिनीने याच ठिकाणचा कॉपी पुरवतानाचा नवा व्हिडीओ समोर आणल्याने पुन्हा वातावरण गंभीर बनले. मात्र हा व्हिडीओ जुनाच असल्याचे परीक्षा केंद्र संचालकाने सांगितले आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर बारावीचा इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तांबेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात मोबाईल फोनवरून बारावीची प्रश्‍नपत्रिका व्हायरल झाल्याचा प्रकार पुढे आल्याने राज्यात खळबळ उडाली. मात्र शिक्षण विभाग आणि पोलिस यंत्रणेने हा प्रकार इथे घडलेलाच नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ही प्रश्‍नपत्रिका मोबाईल फोनवर कुठून आली याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. यानुसार दशरथ सोनवणे यांची पोलिसांनी चौकशी केली असता राम बोंदर यांचे नाव पुढे आले असून पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला आहे. 

दरम्यान, व्हायरल क्लिपमध्ये दिसणारे दुकान आढळून आले असले तरी गावात पोलिस तपासात झेरॉक्स मशीन आढळून आली नाही.

जुना व्हिडीओ व्हायरल

गुरुवारी पुन्हा एका खासगी वृत्तवाहिनीने तांबेवाडी शाळेत कॉपी पुरवत असल्याचा नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये मुले खिडकीवर चढून कॉपी पुरवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हा व्हिडीओ जुना असल्याचे परीक्षा केंद्र संचालकांनी सांगितले आहे. दरम्यान, व्हिडीओ जुना असला तरी  प्रश्‍नपत्रिका व्हायरल झाल्याची घटना सत्य आहे. याच्याशी या परीक्षा केंद्राशी संबंध नसेलही, पण ही बाब गंभीर असल्याने तळापर्यंत तपास होणे महत्त्वाचे आहे.

येथील ज्ञानदीप माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. 394 विद्यार्थी इथे परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रात एक मिनिटदेखील उशिराने येणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करणार्‍या या परीक्षेमध्ये चक्क प्रश्‍नपत्रिकाच व्हायरल होतीय हा प्रकार धक्कादायक आहे.