Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › विजेवर धावली गुलबर्गा-हैदराबाद इंटरसिटी

विजेवर धावली गुलबर्गा-हैदराबाद इंटरसिटी

Published On: Mar 25 2018 10:34PM | Last Updated: Mar 25 2018 10:10PMसोलापूर : प्रतिनिधी

रेल्वे विद्युत विभाग व रेल्वे विकास निगम यांच्या संयुक्त प्रयत्नाने वाडी स्थानक ते गुलबर्गा स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्या अनुषंगाने सोलापूर मध्य रेल्वे विभागातून गुलबर्गा स्थानक ते हैदराबाद स्थानकापर्यंत विद्युत इंजिनावर धावली. यामुळे डिझेलची मोठी बचत व पर्यावरणाची सुरक्षा सुध्दा होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

वाडी ते कलबुर्गी (गुलबर्गा) दरम्यान झालेल्या विद्युतीकरणाच्या कामास मध्य विभागाचे मुख्य संरक्षक आयुक्त ए. के. जैन यांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर शुक्रवारी कलबुर्गी स्थानकावरून विद्युत इंजिनवर पहिली गाडी धावली. कलबुर्गी-हैदराबाद इंटरसिटी या गाडीला विद्युत इंजिन जोडून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे सोलापूर विभागाच्या एका गाडीवर होणारा एक दिवसाचा 1 लाख 87 हजार रुपयांच्या डिझेलची बचत होणार आहे. तसेच 8.5 टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन रोखण्यास मदत होणार आहे. मागील आठवड्यात गुलबर्गा ते वाडी दरम्यान रेल्वेमार्गावर झालेल्या विद्युतीकरणाची पाहणी ए. के. जैन यांनी केली होती. जैन यांनी विद्युतीकरणाच्या कामावर समाधान व्यक्त करून विद्युत इंजिनवर रेल्वेगाडी धावण्यासाठी परवानगी दिली. यानंतर सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने विद्युत इंजिनवर पहिली प्रवासी रेल्वेगाडी शुक्रवारी सोडली. कलबुर्गी-हैदराबाद-कलबुर्गी ही सोलापूर विभागातील पहिली प्रवासी गाडी ठरली असून यानंतर आता दक्षिण भारतातून येणार्‍या सर्व गाड्या विद्युत इंजिनवर थेट कलबुर्गी स्थानकापर्यंत येतील. गुलबर्गा ते दौंडपर्यंत डिझेल इंजिनवर धावतील. यापूर्वी डिझेल इंजिनवर इंटरसिटी एक्स्प्रेस चालवताना 3 सेट कर्मचारी काम करत होते. विद्युत इंजिनामुळे फक्त दोनच कर्मचारी काम करणार आहेत.