Fri, Jul 19, 2019 00:59होमपेज › Solapur › पालकमंत्र्यांच्या भोळ्या स्वभावामुळे विकासावर परिणाम

पालकमंत्र्यांच्या भोळ्या स्वभावामुळे विकासावर परिणाम

Published On: Feb 23 2018 10:47PM | Last Updated: Feb 23 2018 10:23PMसोलापूर ः प्रतिनिधी 

सध्याचे भाजप आणि शिवसेनेचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून अगामीकाळात राष्ट्रवादी या सरकारच्या अनागोंदी कारभाराविरोधात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहे तसेच सरकारला विविध मार्गाने घेरणार असल्याचे राष्ट्रवादीचे निरीक्षक संदीप वरपे यांनी सांगितले आहे.

पक्ष संघटन आणि नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील आणि कार्याध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्ष संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी संदीप वरपेे यांची निवड करण्यात आली असून त्यांनी संघटनेचा आढावा घेतला तसेच सध्याचे सरकार अनेक गोष्टींवर अपयशी ठरत असून नोटबंदी, ऑनलाईन बँकिंग, कर्जमाफी, शेतीमालाचे उतरणारे भाव, शेतकर्‍यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्‍न चव्हाट्यावर असून सरकार यामध्ये अपयशी ठरले आहे. या सरकारला घेरण्यासाठी आता पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. येत्या 15 मार्चपर्यंत पक्ष संघटनेतील तालुकाध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष तसेच विधानसभा अध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी वरपे यांनी दिली. यावेळी लतीफ तांबोळी, उमेश पाटील, निर्मला बावीकर, मंदाताई काळे, विक्रांत माने आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या भोळ्या स्वभावामुळे विकासावर परिणाम

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री खूपच भोळ्या स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांचे विविध विकासकामे तसेच महत्त्वाच्या बैठकांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्ह्याला मिळालेल्या निधीचा विनियोग वेळेवर होत नसल्याने अनेक विभागांचा निधी परत जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्वभाव बदलून विकासकामे आणि शासकीय बैठकांकडे थोडेसे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.

बाजार समितीच्या निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच लढणार 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊनच लढणार असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम काका साठे यांनी दिला असून यापूर्वी काय झाले याचा विचार न करता आगामीकाळातील राजकारण लक्षात घेऊन वाटचाल करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.  राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकार्‍यांनी पक्षाची भूमिका विचारात घेऊन प्रसिध्दी पत्रक काढावे, अशा सूचना करण्यात आल्या.