होमपेज › Solapur › मनपाविरोधात विखे-पाटील विधानसभेत आवाज उठविणार

मनपाविरोधात विखे-पाटील विधानसभेत आवाज उठविणार

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:01PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर महापालिकेतील गटबाजीमुळे रखडलेला विकास, विविध समस्या व भ्रष्टाचाराबाबतची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माझ्याकडून मागविली आहे.  याबाबत ते विधानसभेत आवाज उठविणार आहेत, अशी माहिती मनपाविरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. मंगळवारी मनपा स्थायी सभापतिपदासाठी शिवसेनेचे उमेदवार वानकर यांचा अर्ज दाखल केल्यावर पत्रकारांशी बोलताना कोठे म्हणाले की, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्याला नुकतेच एक पत्र पाठवून मनपाविषयी माहिती देण्यास सांगितले होते. त्यानुसार मी त्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, मनपातील सत्ताधार्‍यांच्या दोन गटांमुळे मनपाचा कारभार ठप्प झाला आहे. गटबाजीमुळे वर्षभरात 20 सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की महापौरांवर आली.  नगरसेवकांना एक रुपयाचाही भांडवली निधी मिळाला नाही. मनपाच्या इतिहासात असे कधीच घडले नाही. सभा न झाल्यामुळे कोणतेही कामकाज झालेले नाही, असे कोठे यांनी पत्रात म्हटले आहे.
झोन रचना तसेच स्कूल बोर्ड स्थापन झाले नाही. मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी सत्ताधारी आपल्या मतदारसंघ वा प्रभागातील विकासकामांसाठी वापरत आहेत.

यामुळे शहराचा समतोल विकास होत नसल्याचे दिसून येते. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना  सत्ताधार्‍यांना अनुमोदक मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सत्तेचा गैरवापर करुन निवडणूक प्रक्रिया रद्द केली. हा एकप्रकारे लोकशाहीचा खून आहे, असा उल्लेखही कोठे यांनी या पत्रात केला आहे. या माहितीचा अभ्यास करून राधाकृष्ण विखे-पाटील हे विधानसभेत आवाज उठविणार आहेत, असे कोठे यांंनी पत्रकारांना सांगितले.