Sun, May 26, 2019 01:01होमपेज › Solapur › हिवरेतील मेंदूमृत रवींद्रमुळे चौघांना मिळणार जीवदान

हिवरेतील मेंदूमृत रवींद्रमुळे चौघांना मिळणार जीवदान

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 9:53PMसोलापूर : प्रतिनिधी

यशोधरा हॉस्पिटल येथे सोमवारी अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे 4 अवयव पुण्याला पाठविण्यात आले़ यात 1 हृदय, 2 किडनी, 2 डोळे, 1 स्वादूपिंड, 1 यकृत या अवयवांचा समावेश आहे़  ब्रेनडेड रवींद्रमुळे चौघांना जीवदान, तर दोघांना दृष्टी मिळणार आहे.रवींद्र श्रीरंग शिंगाडे (वय 31, हिवरे, ता़  मोहोळ) या तरुणाचा शुक्रवार, दि. 20 रोजी सोलापूर-पुणे महामार्गावर हिवरे पाटीनजीक ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात शिंगाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना यशोधरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते. 

त्यांचा मेंदू मृत झाल्याचे निष्पन्‍न होताच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, प्रत्यारोपण समन्वयक, व्यवस्थापनाने अवयवदानासाठी शिंगाडे यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. दुःखात असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानास संमती दिल्यानंतर पुण्यातील झोनल ट्रान्सप्लांट समन्वय समितीने मंजुरी दिल्यानंतर अवयवदानाची रीतसर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार सोमवारी यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर येथे ग्रीन कॉरिडॉरची मोहीम राबविण्यात आली़  दुपारी दोनच्या सुमारास विशेष विमानाने अवयव पुण्याला हलविण्यात आले़यातील हृदय हे रूबी हॉस्पिटल, पुणे, किडनी व स्वादूपिंड हे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे, यकृत हे आदित्य बिर्ला गु्रप हॉस्पिटल, पुणे, 2 डोळे हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात, तर 1 किडनी येथीलच यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर येथे प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले़  

यावेळी रवींद्र शिंगाडे यांची पत्नी वनिता शिंगाडे, आई रंजना शिंगाडे, वडील श्रीरंग शिंगाडे, भाऊ सागर शिंगाडे, मेव्हणे अर्जुन यांनी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही या प्रक्रियेत मदत केली. 
यशोधरा रुग्णालयाचे चेअरमन डॉ. बसवराज कोलूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विजय शिवपुजे, डॉ. आशिष भुतडा, डॉ. सचिन बलदवा, डॉ. मुक्तेश्‍वर शेटे, डॉ. राहुल स्वामी, डॉ. संजय गायकवाड, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. शेहरोज बॉम्बेवाला, प्रशासकीय अधिकारी विजय चंद्रा, शरण मलखेडकर, परेश मनलोर, धनंजय मुळे, डॉ. संदीप लांडगे, संपत हलकट्टी, प्रत्यारोपण समन्वयक सुकांत बेळे यांच्यासह शस्त्रक्रिया विभागातील अधिकारी, नर्स यांनी ही अवयवदान मोहीम यशस्वी केली.

विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर

यशोधरा रुग्णालयापासून होटगी रस्त्यावरील विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून दिला. दुपारी दोन वाजता रुग्णालयातून हृदय घेऊन निघालेली रुग्णवाहिका काही मिनिटांतच विमानतळावर पोहोचली. रवींद्र शिंगाडे यांचे हृदय हेलिकॉप्टरमधून पुण्यातील रूबी हॉस्पिटल येथे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून एक किडनी व स्वादूपिंड हे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, यकृत आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये, दोन्ही डोळे सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सोलापूर ते पुणे रस्त्यावरही ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले.