Fri, Apr 26, 2019 20:02होमपेज › Solapur › वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

Published On: Mar 16 2018 11:07PM | Last Updated: Mar 16 2018 10:59PMबार्शी : गणेश गोडसे

द्राक्ष उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या बार्शी तालुक्यातील पांगरी-कारी परिसरात द्राक्ष बागा विक्रीस आलेल्या असून द्राक्ष विक्रीचा हंगाम जोरात सुरू झालेला आहे. बार्शी तालुक्यात वातावरणात  आमुलाग्र बदल झाल्यामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्याच्या काही भागात गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावून द्राक्ष उत्पादकांना जबरदस्त झटका दिल्यामुळेे शेतकर्‍यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजारपेठेत उठाव नसल्याच्या कारणावरून व्यापारी द्राक्ष बागा घेण्याचे टाळून शेतकर्‍यांची परीक्षा पाहात असल्याचे चित्र पांगरी भागात दिसत आहे. बाजारपेठेतील दर समाधानकारक नसले तरी जेमतेम  असल्याचे दिसून येत आहे. लहरी निसर्गामुळे शेतकरीही आपल्या बागांची विक्री करून मोकळे होत आहेत. 

धाबे दणाणले
हवामान खात्याने अधूनमधून पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे व निर्यातक्षम द्राक्षांचे दर गडगडल्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. पांगरीसह परिसरामधील उक्कडगाव, कारी, पांढरी, चिंचोली, ढेंबरेवाडी, घोळवेवाडी, टोणेवाडी, शिराळे, झानपूर, आगळगाव, येडशी आदी गावात द्राक्षांच्या विविध जातीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील 3 ते 4 वर्षे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना डावणीचा प्रादुर्भाव अवकाळी पावसाचा फटका, मिलीब्गज, थ्रिप्स आदी अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्या तुलनेने यावर्षी आर्थिक भार पडलेला नाही. किरकोळ रोग मात्र मागे होतेच.

उत्पादन खर्च निघणे अवघड
औषधे खते यांच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत भरीव वाढ झालेली असल्यामुळे यावर्षी उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे.वातावरणातील बदल मजुरीत झालेली दुप्पट वाढ निसर्गाची अवकृपा शासनाचे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांबाबत असलेले उदासिन धोरण यासह विविध समस्यांच्या गर्तेत द्राक्ष उत्पादक सापडला आहे.निसर्गाच्या लहरीपणावरील पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. 

व्यापार्‍यांकडून पिळवणूक
साधारण उत्पादनाची शेतकर्‍यांनी धरलेली अपेक्षाही फोल ठरू पहात असून बाजारात उठाव नसल्याचे कारण सांगून व्यापारी द्राक्ष उत्पादकाची पिळवणूक करत असून बागा कवडीमोल दराने खरेदी करण्याच्या विचारात आहेत. यामुळे उत्पादक शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला असून आता पुढे काय, हा प्रश्‍न त्यांना भेडसावू लागलेला आहे.पांगरी भागातील अनेक शेतकर्‍यांचे द्राक्षबागाचे प्लॉट विक्रीस आले आहेत.    
पांगरी हे द्राक्ष हब
पांगरी हे उत्पादन क्षेत्रात व दळणवळणाच्या द‍ृष्टीने केंद्रस्थानी असल्यामुळे नागपूर, नांडेद, वाशिम, हिंगोली, बेंगलोर, केरळ, मुंबई, कर्नाटक, परभणी, निजामाबाद, पुणे, नागफाडा, आंध्रप्रदेश या राज्यांसह इतर राज्यांंमधील अनेक व्यापारी पांगरीत चार महिने मुक्कामी राहून या भागामधील द्राक्षे त्यांच्या भागातील व्यापारपेठेत रवाना करत असतात. मात्र यावर्षी काही प्रमाणात व्यापारी पांगरीत आलेले असून अनेक व्यापार्‍यांचे अद्याप आगमन झालेले नाही. 

यंदा प्रतिसाद थंडा
प्रतिवर्षी पांगरीत 40 ते 50 व्यापारी येत असतात. मात्र यावर्षी फक्त 8 व्यापारीच पांगरीत आलेले आहेत. द्राक्ष विक्री करण्यासाठी उपलब्ध व्यापार्‍यांना द्राक्षबागेत नेऊन माल दाखवला जात आहे.गतवर्षीच्या दराच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा होती. पांगरी भागात माणिकचमन, सोनाका, सरिता, सिडलेस, थॉमसन आदी द्राक्षांच्या जातीचे उत्पादन घेतले जाते. सध्या चांगल्या प्रतीच्या द्राक्षांस 30 ते 35 दर मिळत आहेत. प्रारंभी 30 ते 50 दर मिळत होता. मात्र वातावरणातील बदलामुळे 25 ते 30 रूपयेच दर मिळत आहे.