Thu, May 23, 2019 20:27
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › मुदतीत घरकुल बांधकाम न करणार्‍यांचे अनुदान झाले बंद

मुदतीत घरकुल बांधकाम न करणार्‍यांचे अनुदान झाले बंद

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 26 2018 11:04PM सोलापूर : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागात गतवर्षी तब्बल 13 हजार 29 घरकुल बांधकामास प्रशासनाने मंजुरी दिली होती. यापैकी अजूनही 3 हजार 572 घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. अपूर्ण असलेल्या घरकुलांचे काम वेळेत न झाल्याने शासनाने अनुदान देणे बंद केले आहे. त्यामुळे अजूनही ज्या लाभार्थ्यांना मुदत आहे अशा लाभार्थ्यांनी वेळेत घरकुलाचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी केले आहे. 

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नेतृत्वाखाली घरकुल योजनेत सोलापूर जिल्हा परिषदेने गत वर्षभरात क्रमांक एकची कामगिरी बजावली होती. लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करुन बांधकामानुसार अनुदान वितरित वेळेत झाल्याने याबाबत राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेचे कौतुक करण्यात आले होते. मात्र काही लाभार्थ्यांनी वर्षभराच्या काळात घरकुलाचे काम अपूर्ण ठेवल्याने त्यांना निधी मिळणे मुश्किल झाले आहे. 

जिल्हा परिषदेने मागच्या वर्षी तब्बल 13 हजार 29 घरकुलांच्या बांधकामासाठी मंजुरी दिली. यापैकी 13 हजार 22 घरकुलांसाठी पहिला हप्‍ता वितरित करण्यात आला आहे. 11 हजार 353 घरकुलांसाठी दुसरा हप्‍ता वितरित करण्यात आला आहे. 8 हजार 843 घरकुलांच्या बांधकामासाठी तिसरा हप्‍ता वितरित करण्यात आला आहे. शासनाने बांधकामाच्या स्वरुपानुसार निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकामाची रोजची स्थिती ऑनलाईनने शासनाकडे सादर करण्यात येते. अजूनही 3 हजार 572 घरकुलांचे काम अपूर्ण असल्याने या घरकुलांसाठी अनुदान मिळणे अवघड होत आहे. ज्या लाभार्थ्यांना अजूनही बांधकामासाठी मुदत आहे त्यांनी तातडीने बांधकाम पूर्ण करावे अन्यथा त्यांना अनुदान मिळणार नसल्याचे नवाळे यांनी सांगितले. 

Tags : Grants, Government. Crib Scheme