Sat, Mar 23, 2019 12:12होमपेज › Solapur › ‘ते’ सदस्य विभागीय आयुक्‍तांकडून पात्र

‘ते’ सदस्य विभागीय आयुक्‍तांकडून पात्र

Published On: May 26 2018 12:20AM | Last Updated: May 26 2018 12:12AMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब दाखल करुनही बार्शी येथील तहसील कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविलेल्या बार्शी तालुक्यातील पाच ग्रामपंचायत सदस्यांना पुणे विभागीय आयुक्तांकडे केलेल्या अपिलात पात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाचपैकी चार सदस्यांच्या जागेवर दुसरा सदस्य निवडण्यासाठी सध्या चालू असलेला अंतिम टप्प्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मध्यातच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यामधील उल्लेखनीय बाब ही की, या जागांवरील अपील प्रलंबित असतानाच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 2015 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बार्शी तालुक्यातील कासारवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या कल्पना बलभीम सुतार, जामगाव (पा.)च्या कमल नानासाहेब सातपुते, शेंद्रीच्या कल्पना मारुती शिंदे, तुर्कपिंपरीच्या रंजना शिवाजी झळके, कळंबवाडीचे शिपलागिरी भागवत गोसावी हे पाच सदस्य विजयी झाले होते.

निवडणूक पार पडल्यानंतर संबंधितांनी मुदतीमध्ये आपल्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तहसील कार्यालयात संबंधित विभागाकडे दाखल केलेला होता.तसेच हिशोब दाखल करून तशी अधिकृत पोहोच पावतीही घेतली होती. मात्र तहसील कार्यालयाने  जिल्हाधिकार्‍यांकडे खर्चाचा हिशोब दाखल केला नसल्याचा चुकीचा अहवाल दिला होता. त्याअनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सुनावणी आयोजित करुन या पाचजणांना अपात्र ठरवून पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यासाठी बंदीही घातली होती. याविरोधात दाद मागत या पाच सदस्यांनी अ‍ॅड. विकास जाधव यांच्यामार्फत पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केलेले होते. या अपिलाच्या सुनावणीमध्ये तहसील कार्यालयाकडून झालेली चूक उघडकीस आली. तहसीलदारांनी या पाचही ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीमध्ये हिशोब सादर केल्याबाबतचा अहवाल दिला. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी सदस्यांनी मुदतीत हिशोब दिल्याचे मान्य करत जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय रद्द केला आहे.