Sat, Jul 20, 2019 08:46होमपेज › Solapur › ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे बेमुदत धरणे आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे बेमुदत धरणे आंदोलन

Published On: Sep 10 2018 11:18PM | Last Updated: Sep 10 2018 10:19PMपंढरपूर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा गेल्या 11 महिन्यांपासून पगार थकला आहे.  त्यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून मुलांच्या शैक्षणिक फी भरण्याचे मोठे संकट पालकांवर आले आहे. त्यामुळे थकीत पगार त्वरित मिळावा. अन्यथा बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल. असा इशारा पंढरपूर तालुका ग्रामपंचायत संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंजायत कर्मचारी अत्यंत अल्प पगारावी ग्रामपंचायतीमध्ये काम करत आहेत. 

अल्प पगारात कुटुंबांचा गाडा चालवताना कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असताना ऑनलाईन प्रणालीमुळे गेल्या 11 महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. मुलांचे शिक्षणासाठी येणारा खर्च, कुटुंबातील व्यक्तिंचे आजारपणात प्राथमिक औषधोपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. 

त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन थकण्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्याकारी अधिकारी, बीडीओ जबाबदार आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांनी थकीत पगाराकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्याविरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला होता. 

मात्र या इशार्‍याकडेही गांभीर्याने न पाहिल्याने अखेर सोमवार दि. 10 ऑक्टोबर पासून पंढरपूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्वरीत पगार जमा न केल्यास उपोषणा दरम्यान  अनपेक्षित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या बेमुदत धरणे आंदोलनात तालुकाध्यक्ष व्ही.एस. पडवळे, सचिव एस.व्ही. भोसले, रणजित ढोले, बाजीराव धुमाळ, अविनाश बार्ले, साधू जाधव, हणमंत बंडलकर, दत्तात्रय कोकरे, तानाजी कोळी, हरी माने, सलिम मुलाणी, सविता शिंदे, सुनंदा लोंढे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.