Fri, May 24, 2019 21:37होमपेज › Solapur › यापुढे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन होणार ऑनलाईन

यापुढे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन होणार ऑनलाईन

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:55PM

बुकमार्क करा
बार्शी : गणेश गोडसे

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या ऑनलाईन वेतन पद्धतीच्या लढ्यास अखेर यश आले असून यापुढे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन  ऑनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने नुकताच  हा निर्णय जाहीर करण्यात आला  असल्यामुळे राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना अनुज्ञेय असलेले किमान वेतन त्यांना वेळेवर  मिळत नसल्यामुळे त्यांचे वेतन हे बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात यावे, अशी मागणी ग्रामविकास विभागाकडे ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक संलग्न) व इतर ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने सतत करण्यात येत होती.त्या मागणीस अनुसरून कर्मचार्‍यांचे बँक खाते आधारकार्डशी जोडून त्यांचे वेतन, राहणीमान भत्यासह परस्पर त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन होती. ऑनलाईन वेतन प्रणालीचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीने दर चार वर्षांनी नियमित फेर आकारणी करणे, मागील वर्षात एकूण कराच्या एकूण मागणीच्या 90 टक्के वसुली करणे मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच 100 व 75  टक्के  वाढीव हिश्यास पात्र होण्यासाठी ग्रामपंचायतीने त्या-त्या वर्षी 90 टक्के  वसुली करणे बंधनकारक करण्यात  आलेले आहे. ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम संबंधित कर्मचार्‍यांच्या नावावर जमा करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यास त्यांच्या वेतन  अनुदानाच्या  शासनाच्या देय हिश्यातून 8.33 टक्के रक्कम ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतन प्रणालीद्वारे उक्त संयुक्त खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतन  अनुदानापोटी ग्रा.पं.च्या हिश्याच्या रकमेच्या 8.33 टक्के  रक्कम अधिक ग्रामपंचायतीचा हिस्सा भविष्य निर्वाह निधीच्या सदर संयुक्त बँक खात्यात ग्रा.पं.तर्फे जमा करण्यात येईल. कर्मचार्‍यांना देय असणारा राहणीमान भत्ता हा ज्यादिवशी कर्मचार्‍यांच्या वेतन  अनुदानाची रटक्कम संबंधित बँकेमार्फत संबंधित कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या बँक खात्यावर जमा होईल, त्या दिवसापासून तीन दिवसांच्या आत ग्रामपंचायतीने कर्मचार्‍यांच्या वेतनाकरिता ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये नोंदवलेल्या बँक खात्यावर जमा करावयाचा आहे. 
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक संलग्न) यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार  आंदोलने करून मागणी लावून धरली होती. राज्य अध्यक्ष तानाजी ठोंबरे, सरचिटणीस  ए.बी. कुलकर्णी, बापू सुरवसे, पांडुरंग यादव, प्रदीप कदम, रशिद  इनामदार, दत्ता कदम यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी यासाठी वारंवार आवाज  उठवला होता. ऑनलाईन वेतन पद्धतीमुळे कर्मचार्‍यांना मोठा लाभ होणार आहे. नियमित वेतन खात्यावर जमा होणार असल्यामुळे कौटुंबिक आर्थिक अडचणी सुटण्यासही मोठी मदत होणार आहे. ग्रामपंचायतीकडून वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत  असे.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या दीर्घकालीन व जिव्हाळ्याच्या निर्णयाचे स्वागत. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी एकजुटीने दिलेल्या लढ्यास यश प्राप्त झाले आहे. मात्र हा लढा कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन जाहीर होईपर्यंत सुरूच राहील.


       - तानाजी ठोंबरे.(अध्यक्ष, ग्रा.पं. कर्मचारी संघटना)