Wed, Apr 24, 2019 22:07होमपेज › Solapur › निमित्त ग्रामपंचायत; लक्ष विधानसभा

निमित्त ग्रामपंचायत; लक्ष विधानसभा

Published On: Sep 13 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 8:31PMमंगळवेढा : प्रा सचिन इंगळे

विधानसभा निवडणुकीची बांधणी करण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती  जिल्हा परिषदेवर वर्चस्व असणे आवश्यक आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणार्‍या तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून सध्या तालुक्यात आ. भारत भालके यानी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले आहे.  समाधान आवताडे यांनी दामाजी साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर दहा रु. किलो ने देण्याचा निर्णय घेत आ. भालके व आ. परिचारक हे नूरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप केला आहे.

या ग्रामपंचायतीसाठी 26 सप्टेबर रोजी मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी 27 सप्टेबर रोजी होणार आहे. यामध्ये तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी, मानेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, डिकसळ, देगाव, रेवेवाडी, जित्ती, हुन्नुर, कागष्ट, खवे, येळगी या ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.  यापैकी खवे, लोणार, डिकसळ, देगाव, मानेवाडी  या ग्रामपंचायती आ .भालके यांंच्या समर्थकाकडे आहेत. मागे झालेल्या ग्रामपंचायतीतील निवडलेल्या सरपंचावर दोन्ही गटाने दावे केल्याने याबाबत निष्ठावंतांना निवडणुकीत उतरविण्याबाबत चाचपणी सुरू आहे. गेल्या दीड वर्षात झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये तालुक्यातील आ. भालके, आ. परिचारक, समाधान आवताडे यांनी सहभाग घेत साम, दाम, दंड, भेद, नीती अवलंबली होती. यात आ. भालके व आवताडे यांनी जास्त जागा मिळवल्या मात्र आ. परिचारक हे थोडेसे पिछाडीस होते. 

आ. भालके यांना कार्यकर्त्यांची मोट बांधून अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. या बारा ग्रामपंचायती त्यांना सोप्या नाहीत तर आवताडे गटाने समाजकल्याण सभापती शिला शिवशरण यांच्या माध्यमातून 1 कोटी 18 लाखांचा निधी तालुक्यासाठी मंजूर केला आहे. शिवाय आवताडे गटाकडे पं. समिती, जि. परिषद, सोसायटी, खरेदी वि. संघ, कृ. ऊ. बाजार समिती, संत दामाजी सह्कारी साखर कारखान्यासारख्या संस्था आहेत. तर आ. परिचारकाकडे जिल्हा दूध संघ, युटोपियन शुगर, पंढरपूर अर्बन बँक इ.संस्था तालुक्यातील जनतेच्या उपयोगासाठी असून देखील परिचारक यांना राजकीय जम बसविण्यास मंगळवेढ्यासाठी अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. 

परिचारक यांचा गट अजूनही तालुक्यात पूर्ण तयारीने काम करत असल्याचे चित्र पहायला मिळत नाही. स्थानिक नेते हे कार्यकर्त्यांची टाळाटाळ करतात असे आरोप ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्ते करीत आहेत. यात उमेश परिचारक यानी स्वत: लक्ष घालावे असेही खासगीत बोलत आहेत. 

तिन्ही गटाला  चांगला जनसंपर्क व आर्थिकदृष्टया सक्षम उमेदवार निवडताना डोके दुखी ठरणार असल्यामुळे आगामी काळातील त्यांच्या हालचाली या निर्णायक ठरणार आहेत. कोणत्या उमेदवारांची निवड करावी आणि बंडाळी कशी थांबवावी असा प्रश्न तिन्ही गटा समोर आहे. निवडणुकीतही राजकीय आरोप, प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होणार असले तरी आपली भूमिका मतदारांच्या गळी उतरवून कोण मतदाराचा कौल मिळविण्यात यशस्वी होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.