Sat, Aug 17, 2019 17:13होमपेज › Solapur › सोलापुरात शासनाची वैज्ञानिक प्रयोगशाळा 

सोलापुरात शासनाची वैज्ञानिक प्रयोगशाळा 

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 24 2018 10:36PMसोलापूर : महेश पांढरे 

समाजात घडणार्‍या निरनिराळ्या गुन्ह्यातील जप्त नमुन्यांचे शास्त्रीय पध्दतीने विश्‍लेषण करुन त्याबाबतचा अहवाल विहीत कालावधीत तपासी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने आता सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सोलापुरात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तपासकामाला गती येणार आहे.

विविध गुन्ह्यातील तपास करण्यासाठी व गुन्हा सिध्द करण्यासाठी न्यायालयात वैज्ञानिक पुरावा सादर करण्यासाठी अशा प्रयोगशाळांची भूमिका महत्त्वाची असते. फौजदारी खटल्यातील आरोपी सिध्द करण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अशा प्रयोगशाळा महत्त्वाच्या असतात. त्यासाठी अशा न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रधान सचिव गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. यावेळी गठीत करण्यात आलेल्या समितीने शासनाला अहवाल सादर केला असून यामध्ये नव्याने 5 प्रयोगशाळा निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच याठिकाणी अद्ययावत यंत्रसामुग्री व साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्याबाबतची शिफारस केली आहे. यापूर्वी राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबई येथे मुख्यालय असून नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे आठ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र याठिकाणी येणार्‍या प्रकरणांची संख्या अधिक असल्याने सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून तपासी यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने नव्याने प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यामुळे फौजदारी खटल्यातील सिध्दपराध प्रमाण वाढविण्यासाठी जीवशास्त्र व विषशास्त्र हे दोन विभाग समाविष्ट असलेली अद्ययावत प्रयोगशाळा आता सोलापुरात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 1 कोटी 62 लाख रुपयांच्या खर्चालाही आता शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे लवकरच सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभी राहणार आहे.