Thu, Jun 27, 2019 11:45होमपेज › Solapur › कर्मचार्‍यांच्या संपामुळे शासकीय कार्यालये ओस

कर्मचार्‍यांच्या संपामुळे शासकीय कार्यालये ओस

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 10:38PMसोलापूर : पुढारी चमू

सातवा वेतन आयोग, अनुकंपा भरती, निवृत्तीचे वय 60, पाच दिवसांचा आठवडा, पदोन्नती, रिक्‍त पदे भरणे आदी अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या  नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वच शासकीय-निमशासकीय कर्मचारी संघटनांनी 7 ते 9 ऑगस्ट असे तीन दिवस पुकारलेल्या संपास शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. संपाच्या पहिल्या दिवशी जवळपास सर्वच शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कर्मचारी संघटनांनी निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून भावना व्यक्‍त केल्या. यावेळी शंकर जाधव, शंतनू गायकवाड, प्रवीण शिरसीकर, जुगदार, विवेक लिंगराज, नितीन पाटील, डॉ. ए.पी. माने,  सटवाजी होटकर, राजीव गाडेकर, मृणालिनी शिंदे, प्रमिला कुंभारे, अशोक जयसिंगपुरे, बाळकृष्ण माने, बबन जोगदंड, अनिता जाधव, मुक्‍ताबाई बोमणे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मिनीमंत्रालयाचे 15 हजार कारभारी संपावर, काम ठप्प
शासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारपासून मिनीमंत्रालयातील सुमारे 15 हजार कर्मचारी व शिक्षकांनी संप सुरु केला. या संपात प्राथमिक शाळेतील सुमारे दहा हजार शिक्षक  व ग्रामसेवक, आरोग्य, लेखा आदी संघटनेच्या सुमारे पाच हजार असे एकूण 15 हजार कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प करुन राज्य शासनाचे लक्ष वेधले.


जि.प. कर्मचारी युनियनचे राज्याचे सरचिटणीस विवेक लिंगराज यांच्या नेतृत्वाखाली सकाळी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. राज्य शासनाने तातडीने कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला. 

या आंदोलनात युनियनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कस्तुरे, लेखा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, वाहनचालक संघटनेचे भीमाशंकर कोळी, परिचर संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल देशमुख, कृषी संघटनेचे सचिव उमेश काटे, शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे बापूसाहेब जमादार, पंचायत समिती विस्तार अधिकारी संघटनेचे राजशेखर कमळे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे वाय.पी. कांबळे, पशुचिकित्सक संघटनेचे डॉ. एस.पी.माने, पर्यवेक्षिका संघटनेचे माधवी शिंदे, महिला कर्मचारी युनियनचे मृणालिनी शिंदे, अपंग कर्मचारी युनियनचे लक्ष्मण वंजारी आदींसह अन्य 19 संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

 या संपामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीत दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता. ग्रामीण भागातील जि.प. शाळेत शिक्षक नसल्याने व आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्याने याठिकाणीही शुकशुकाट दिसून आला. ग्रामसेवक वर्गीय कर्मचार्‍यांनीही संपात सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा ठप्प असल्याचे चित्र दिसून आले. लिपिकवर्गीय संघटना, मागासवर्गीय संघटना या दोन संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांनी या संपात सहभाग घेतला नसल्याचेही दिसून आले. जि.प. कर्मचारी युनियनच्यावतीने केवळ एक दिवसाचा संप पुकारण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आदी ठिकाणी कर्मचारीच नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. कर्मचारीच संपावर असल्याने अनेकांना परत माघारी फिरण्याची वेळ शासकीय कार्यालयातून आली. 

सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, तत्पूर्वी यापूर्वीच्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यात याव्यात, अ‍ॅडव्हान्स म्हणून गणेशोत्सवात कर्मचार्‍यांना 25 हजार रुपये रक्‍कम देण्यात यावी, अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कर्मचार्‍यांवरील अतिरीक्‍त कामाचा भार कमी करण्यात यावा, रिक्‍त पदे तातडीने भरण्यात यावीत आदींसह यावेळी 23 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.