Thu, Aug 22, 2019 03:56होमपेज › Solapur › आजपासून प्रशासकीय यंत्रणा कोलमडणार

आजपासून प्रशासकीय यंत्रणा कोलमडणार

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 10:29PMसोलापूर : प्रतिनिधी

सातवा वेतन आयोग, अनुकंपा भरती, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचार्‍यांच्या सर्वच संघटनांनी संपूर्ण राज्यभर 7 ते 9 ऑगस्ट असा तीन दिवस संप पुकारला असून या संपात सोलापूर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय 19 हजार 450 कर्मचारी संपात सहभागी असल्याने आजपासून शासकीय यंत्रणा कोलमडणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्याबाबत शासन उदासीनता दाखवत आहे. कोणत्याही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. राज्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. संप पुकारल्यानंतर शासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कर्मचार्‍यांना जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु सोमवार, 6 ऑगस्ट रोजी मुंबई येथे कर्मचारी संघटनांच्या सर्व प्रमुखांच्या झालेल्या बैठकीत शासनाने दिलेल्या आश्‍वासनावर विश्‍वास न ठेवता पुकारलेला तीन दिवसीय संप करण्याचा निर्धार केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जाहीर घोषणेनंतरही शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी सरकारच्या विरोधात जात संप करण्याचा निर्धार केला असल्याने मंगळवार, 7 ऑगस्टपासून प्रशासकीय यंत्रणा ठप्प होणार आहे.

शासकीय कर्मचारी संघटनांनी अत्यावश्यक सेवा देखील संपातून वगळण्यात आलेल्या नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शासकीय दवाखान्यातील नर्सेस, स्वीपर हे देखील संपात सहभागी असल्याने शासकीय दवाखान्यातील रुग्णांचे हाल होणार आहेत.

हे संपात सहभागी नाहीत

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना या संपात सहभागी नसल्याचे कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांवर 4, 5, 6 व्या वेतन आयोगापासून सतत अन्याय झाला आहे. त्या त्रुटी दूर कराव्यात अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आमची संघटना संपात सहभागी नाही पण 7 ऑगस्टपासूनच्या संपास संपूर्ण पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्रकात नमूद आहे.