सोलापूर : इरफान शेख
सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन बंद होऊ न देण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून शासकीय तंत्रनिकेतनऐवजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मंजुरीचा प्रस्ताव लोणेरे येथील ‘बाटू’ अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठाकडे सादर केला आहे. ‘बाटू’ची कमिटी 11 मार्च रोजी तपासणी करण्यासाठी येणार असल्याचे पत्र प्रशासनास प्राप्त झाले आहे.
शासनाच्या सततच्या बदलणार्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. श्रेणीवर्धनाच्या गोंडस नावाखाली शासकीय तंत्रनिकेतन बंद करुन त्याचे डिग्री कॉलेजमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय शासनाने 2016 या वर्षी घेतला होता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापुरात झाल्याने सर्व स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात आला होता. मात्र डिप्लोमा कॉलेज बंद करून त्याऐवजी डिग्री कॉलेज येणार ही बाब समोर आल्यावर त्याला विरोध सुरू झाला. डिग्री किंवा डिप्लोमा अशी सौदेबाजी न करता डिप्लोमासह डिग्री करा, अशी आग्रही मागणी सोलापूरकरांनी मांडली होती. परंतु सोलापूरकरांच्या व विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा आली आहे.
‘बाटू’ बाबतच्या तरतुदीनुसार पदवी व पदव्युत्तर स्तरावरील नवीन संस्थांसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र 2017 या वर्षी शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या नोंदणीसाठी सोलापूर विद्यापीठाकडे अर्ज दाखल करण्यात आले होते. नोंदणीसाठी जमा केलेला लाखोंचा खर्च वाया गेला. कोणताही विचार न करता श्रेणीवर्धनाचा निर्णय लादण्यात येत आहे. नवीन अभियांत्रिकी कॉलेजची नोंदणी ‘बाटू’ कडेच करावयाची असेल तर सोलापूर विद्यापीठाकडे नोंदणीचे आदेश का देण्यात आले होते? सोलापूर विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आलेल्या लाखोंच्या रकमेस जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
विद्यार्थ्यांचे शासनास प्रश्न
नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाचा खर्च परवडत नसेल तर अचलपूर (अमरावती) येथील नगरपरिषदेचे तंत्रनिकेतन शासनाकडे वर्ग करण्याचे कारण काय? परभणी येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन स्थापन होणार आहे, तर सोलापूरचे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जड का झाले? एसआयटीच्या नियमानुसार तंत्रनिकेतन व डिग्री कॉलेजेस एका ठिकाणी चालत नसतील तर सांगली,कराड,औरंगाबाद आदी जिल्ह्यातील शासकीय डिप्लोमा कॉलेजेस बेकायदेशीर म्हणून बंद करणार का?