Thu, Apr 25, 2019 18:46होमपेज › Solapur › भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळा

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळा

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 10:06PMसोलापूर : अमोल व्यवहारे

समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये झालेल्या अपहारप्रकरणी   आर्थिक  गुन्हे   शाखेच्या पोलिसांनी 43 आरोपींविरुद्ध 200 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या गुन्ह्यात सुमारे 120 आरोपी पोलिसांच्या तपासात निष्पन्‍न झाले असून उर्वरित आरोपींविरुद्धही न्यायालयात लवकरच टप्प्याटप्प्याने दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये सन 2011 पासून ते 2014 पर्यंत 1 कोटी 17 लाख 93 हजार 178 रुपयांचा अपहार झाल्याबाबत तत्कालीन   समाजकल्याण सहायक आयुक्‍त मनीषा फुले यांच्या फिर्यादीवरून 32 जणांविरुद्ध जून 2015 रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात   गुन्हा  नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून तपासामध्ये या अपहाराची  रक्‍कम ही 7 कोटी 17 लाख रुपयांवर गेली असून आरोपींची संख्या ही जवळपास 120 वर गेली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी निष्पन्न झालेल्या आरोपींकडून सुमारे 60 लाख रुपये रोख रक्‍कम जप्‍त केली आहे तसेच न्यायालयात  आरोपींनी  सुमारे  एक  कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्‍कम जमा केलेली आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींची सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त  रकमेची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. 

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना सुरूवातीला 21 आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले व नंतर 22 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. लवकरच उर्वरित आरोपींविरुद्धही दोषारोपपत्र दाखल करण्यात   येणार आहे. या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात येत असून या गुन्ह्याचा तपास सुरुच आहे. पोलिसांकडून न्यायालयात या गुन्ह्याची 2014 कागदपत्रे दाखल करण्यात आली असून सुमारे 200 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.